Thu, Jan 24, 2019 07:44होमपेज › Solapur › ९१ वर्षीय आमदार गणपतराव आबांचा एसटी प्रवास...(व्हिडिओ)

९१ वर्षीय आमदार गणपतराव आबांचा एसटी प्रवास...(व्हिडिओ)

Published On: Dec 20 2017 7:25PM | Last Updated: Dec 20 2017 7:39PM

बुकमार्क करा

सोलापूर : श्रीकांत साबळे

एक टर्मची आमदारकी किंवा खासदारकी मिळाली की पुढच्या टर्मला आमदार-खासदारमहोदय हायफाय चारचाकीतून धुरळा उडवतच सभागृहाच्या पायर्‍या चढतानाची अनेक उदाहरणे आपण पाहतो. परंतु एक-दोन नव्हे तर तब्बल अकरावेळा विधानसभेची पायरी चढणारे आमदार राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना कुठे दिसले तर अनेकांची बोटे तोंडात गेल्याशिवाय राहात नाहीत. असाच आदर्श जगासमोर ठेवला आहे, तो सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी. 

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी गणपतरावआबा सध्या नागपुरात आहेत. आमदार निवास ते विधीमंडळ या प्रवासासाठी आबा सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा वापर करत आहेत. तत्त्वनिष्ठेचे मूर्तीमंत उहाहरण म्हणून सर्वांना परिचयाचे असलेल्या आबांचा हा साधेपणा धुरळा उडवत हायफाय गाडीतून ये-जा करणार्‍या तथाकथित तत्त्वनिष्ठ आमदारांना मान खाली घालायला लावणारा असाच आहे. 

साधी राहणी व स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणातील आदर्श दीपस्तंभासारखे गणपतआबा टिकून आहेत. ते पहिल्यांदा 1962 साली आमदार म्हणून विधानसभेत गेले. त्यानंतर 1972 आणि 1995 वगळता अकरावेळा सांगोल्यातून निवडून आले. 1978 च्या पुलोद राजवटीत आणि 1999 च्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषविले. कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला त्यांच्यामागे गणपतआबांचे अथक प्रयत्न, चिकाटीने काम करण्याची जिद्द कारणीभूत आहे.  

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने गरीब लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला. वैयक्तिक स्वार्थ व लाभ मिळविणे हा आमदारांचा एकमेव उद्देश कदापी असू शकत नाही हे गणपतआबा यांनी आपल्या ध्येयवादी राजकारणातून दाखवून दिले. विधीमंडळाच्या चालू अधिवेशनातूनही हेच जगासमोर आले आहे, हे मात्र नक्की.

डेंग्यू आजाराला चकवा देत धरली नागपूरची वाट

भाई आ. गणपतराव देशमुख हे मागील दीड महिन्यापासून डेंग्यू आजाराने त्रस्त होते. शरीरात प्रचंड अशक्तपणा असतानाही त्यांनी सांगोला तालुक्यातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. आ. देशमुख यांनी आजतागायत एकदाही विधीमंडळाचे अधिवेशन चुकविले नाही. यंदा डेंग्यू आजाराने ग्रासल्याने यात खंड पडेल, असा अंदाज होता. मात्र अशाही परिस्थितीत 91 वर्षीय गणपतआबांनी डेंग्यूला चकवा देत थेट नागपूरचा रस्ता धरला आणि सर्वांचे अंदाज चुकवित सुखद धक्का दिला. त्यांच्या या कणखरपणाची व जिद्दीची सोशल मीडियावर मोठी चर्चा घडत आहे.