Fri, Jul 19, 2019 16:54होमपेज › Solapur › दीड कोटींचे नुकसान; ११७ बसेस फोडल्या!

दीड कोटींचे नुकसान; ११७ बसेस फोडल्या!

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:35PMसोलापूर : इरफान शेख

एसटी म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांची हक्काची जीवनवाहिनी, हक्काचे प्रवासाचे साधन. ग्रामीण भागातील  मुलांना, तरुणांना शाळेत व महाविद्यालयात  पोहोचवणारी  एसटी, ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात घरी पोहोचवणारी एसटी, आपल्या हक्काची एसटी. पण आज आपण या हक्काचा जरा जास्तच दुरुपयोग करतोय किंवा जास्तच हक्क गाजवतोय, असे चित्र निर्माण झाले आहे. आषाढी यात्रा सुरू झाल्यापासून आजतागायत सोलापूर जिल्ह्यामधील विविध आगारांतील 117  एसटी बसेस फोडण्यात आल्या. यामध्ये एसटी महामंडळाचे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.

     एखाद्या संपात, आंदोलनात अगदी सर्रासपणे टार्गेट केली जाते ती आपली लालपरी. आंदोलन  किंवा  संप कोणत्याही कारणासाठी त्या गोष्टीशी एसटीचा काडीमात्र संबंध नसताना तिच्यावर दगडफेक केली जाते. काही ठिकाणी तर पूर्ण गाडीच पेटवली जाते. का? एसटीच का? तिचा या सगळ्यांशी काय संबंध? एसटीवर दगडफेक करून आपल्याला आपले हक्क मिळणार आहेत का? सरकारवर असलेला राग एसटीवर काढून काय साध्य होणार आहे? जिने आपल्याला  लहानपणापासून आपल्या कुशीत घेऊन या महाराष्ट्रात फिरवले, जिच्यातून आपण शिक्षणासाठी नेहमी प्रवास केला तिच्यावर दगड फेकताना जराही आपल्या मनात तिच्या या मायेचे, उपकारचे विचार आले नाहीत का?

    एसटी बस नसेल तर

ऐन दिवाळीत एसटी कामगारांनी आपल्या हक्कासाठी संप केला. त्यावेळी दिवाळीच्या सुटीत गावी जाणार्‍या प्रवाशांचे कसे हाल झाले होते, हे आठवले तर अंगावर शहारे येतात. एखाद्या ठिकाणी जायचे एसटीचे तिकीट 50 रुपये असेल, पण जेव्हा एसटी बंद असते तेव्हा त्याच ठिकाणी जायचे 50 रुपच्याच्या जागी प्रायव्हेट गाड्यांना 100-150 रुपये द्यावे लागतात. तो काळ आठवला तर डोळ्यांत पाणी येते. एखाद्या गावातून एखाद्या दिवशी एसटी बस बंद असेल तर त्या गावातील शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे किती हाल होतात, ते विचार करण्यासारखे आहे.

   एसटी कर्मचार्‍यांची व्यथा

लाखो कर्मचारी एसटीवर अवलंबून आहेत. तिला मारलेला दगड हा प्रत्येक एसटी कर्मचार्‍याच्या काळजाला मारलेला दगड आहे. खरेतर फक्त  एसटी कर्मचार्‍यांच्या नाही तर प्रत्येक एसटी प्रवाशांच्या काळजाला तो दगड लागला पाहिजे. 

कारण आपण हक्काने आपली एसटी असे म्हणून तिच्यातून फिरतो. आपल्या मुलांना त्याच एसटीतून शिक्षण घेण्यासाठी पाठवतो. प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असे एसटी कर्मचारी सोशल मीडियावरून जनतेला संदेश देऊ लागले आहेत.

आज एसटीवर दगडफेक आणि जाळपोळ करणारे उद्या त्याच एसटीने अगदी मानाने प्रवास करतील. आंदोलनात गाड्या फोडल्या जातात, जाळल्या जातात आणि आपणच अपेक्षा करतो की एसटी नीट असली पाहिजे. एसटी बसवर दगडफेक करून काहीही साध्य होत नाही. उलट आपण आपल्याच सेवेसाठी असलेल्या साधनांची नासधूस करतोय, एवढे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.