होमपेज › Solapur › लिंगायत धर्मीयांचा एल्गार

लिंगायत धर्मीयांचा एल्गार

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 10:10PMसोलापूर : पुढारी चमू

सिद्धरामेश्‍वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सोलापूरनगरीत आज स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी महामोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये राज्यभरासह कर्नाटक, तेलंगणा येथून सुमारे दहा हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. कर्नाटकात यश मिळाल्यानंतर आता आंदोनलनाची ही मशाल महाराष्ट्रात चेतवली असून आज सोलापुरात ती धगधगली आणि ‘भारतदेशा ..जय बसवेशा, वब्ब लिंगायत, कोटी लिंगायत..’ अशा घोषणांनी सोलापूरचे आसमंत दुमदुमून गेले. 

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, राष्ट्रीय स्तरावर या धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा आणि 2021 मध्ये होणार्‍या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची परिपत्रकांमध्ये वेगळा कॉलम देऊन लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी  सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास म. बसवेश्‍वर सर्कल येथील बसवेश्‍वरांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. अग्रभागी बॅण्ड पथक, त्यापाठोपाठ पुरुष कार्यकर्त्यांची फौज, त्यानंतर महिला कार्यकर्त्यांची फलटन, तर मागोमाग मोर्चाचे नेतृत्व करणारे 103 वर्षांचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची बग्गी, त्याबरोबर डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी, भालकी (बिदर) आणि प्रथम महिला जगद‍्गुरू डॉ. माते महादेवी (बेंगलोर) यांच्या बग्गी मोर्चात सहभागी झाल्या होत्या.  भगवी टोपी त्यावर मी लिंगायत-धर्म लिंगायतचा संदेश, भगव्या पताका त्यावर बसवेश्‍वरांची छबी आणि लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्मचा संदेश, ताशा ढोलचा ठेका आणि त्यावर नृत्य करत जल्लोष करणारे कार्यकर्ते आणि लिंगायत धर्माच्या जयजयकाराच्या घोषणा देत मोर्चाने सुरुवातीला मधला मारुतीकडे कूच केली. 

माणिक चौक आजोबा गणपती मंदिर मार्गे विजापूर वेशीतील चौकामध्ये मोर्चा आला. तेथून सरळ तो पंचकट्टा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय गेट समोर (होम मैदानाच्या जवळील) धडकला. मैदानावर बांधण्यात आलेल्या भव्य मंचावर मोर्चात सहभागी झालेले विविध धर्मपीठांचे महास्वामी, अ. भा. लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी स्थानापन्न झाले आणि मोर्चाचे रुपांत सभेत झाले.
 सुरुवातीला एका युवतीने जाज्वल्य भाषणाची ज्योत पेटवली आणि तेथून स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी मंचावरून महास्वामींच्या तोफा धडाडल्या.