होमपेज › Solapur › लक्ष्मी बँकेची फसवणूक; अमोल सोनकवडे अटकेत

लक्ष्मी बँकेची फसवणूक; अमोल सोनकवडे अटकेत

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 10:54PMसोलापूर : प्रतिनिधी

दी लक्ष्मी को-ऑप. बँकेची 1 कोटी 60 लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एप्रिल 2016 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात  सोलापूर शहर आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्वप्निल असोसिएटचा भागीदार अमोल सोनकवडे यास मंगळवारी रात्री अटक केली. सोनकवडे यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायदंडाधिकारी  देवकते यांनी 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

अमोल जयप्रकाश सोनकवडे (वय 34, पद्मनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यात स्वप्निल असोसिएटचे भागीदार दीपक नारायण सोनकवडे (56, रा. भवानी पेठ) यास अटक करण्यात आली असून सोरेगावचा तत्कालीन तलाठी सिद्राम बाबुराव जाधव (53, रा. उत्तर कसबा, तरटी नाका पोलिस चौकीजवळ) हा अद्याप फरार आहे. याबाबत दी लक्ष्मी को-ऑप. बँकेच्या पांजरापोळ शाखेचे व्यवस्थापक सुनील विठ्ठल एकबोटे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

स्वप्निल डेव्हलपर्सचा भागीदार अमोल सोनवकडे, दीपक सोनकवडे यांनी सोलापूर महानगरपालिका हद्दीतील  सोरेगाव येथील 23200 चौ.मी. जागा दि लक्ष्मी को-ऑप. बँकेचे व्यवस्थापक सुनील  एकबोटे  यांना गहाण तारण देऊन सन 2011 मध्ये 1 कोटी 60 लाख रुपये कर्ज घेतले होते. बँकेला गहाण खत करून दिलेल्या जागा नंतर अमोल सोनकवडे याने विकसित कन प्लॉट पाडून त्याची विक्री केली. कर्ज देताना बँकेने सोनकवडे यांना  ती  जागा  विकताना  बँकेची लेखी परवानगी  घेऊन विक्री करणे, विक्रीच्या रकमेपैकी काही रक्कम बँकेने दिलेले कर्ज फेडण्यासाठी बँकेत जमा करणे व प्लॉटच्या सात-बारावरील बँकेचा बोजा चढविणे अशा अटी घातलेल्या होत्या. सोनकवडे याने बँकेच्या एकाही अटीचे पालन न करता तसेच बँकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता गहाण जागेवरील  64  प्लॉट  हे  प्लॉटधारकांना विकले आणि त्या प्लॉटवर असलेला बँकेचा बोजा सात-बारावर न दाखविता तारण अटींचा भंग करुन बँकेची 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केली.  हे सर्व करताना सोरेगावचा तलाठी सिद्राम जाधव याने सोनकवडे यास मदत केली. तसेच प्लॉटधारकांना प्लॉट विकून आलेले 61 लाख 25 हजार 497 रुपयांचाही अपहार केला म्हणून 17 एप्रिल 2016 रोजी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

या गुन्ह्याचा तपास करताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनकवडे यास मंगळवारी रात्री अटक केली. सोनकवडे यास बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Tags : solapur, Laxmi Bank fraud, Amol Sonakwade, arrested,