Mon, Jun 17, 2019 02:54होमपेज › Solapur › पोलिसांच्याच गुन्हेगारीमुळे  पोलीस ठाणे बदनाम !

पोलिसांच्याच गुन्हेगारीमुळे  पोलीस ठाणे बदनाम !

Published On: Jun 03 2018 5:35PM | Last Updated: Jun 03 2018 5:35PMकरकंब : भीमा व्यवहारे 

राज्यातील काही पोलीस ठाण्याची ओळख त्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीमुळे होत असली, तरी पंढरपूर तालुक्यातील करकम्ब पोलीस ठाणे पोलिसांच्याच गुन्हेगारीमुळे बदनाम होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी कमी करणे,अवैध धंदे बंद करणे याकडे लक्ष न देता, करकंब पोलीस स्टेशन पोलिसांच्या च कारनाम्यामुळे नेहमी चर्चेत येत आहे, जेमतेम 6 वर्षापुर्वी सुरू झालेल्या या पोलीस ठाण्यात आतापर्यंत तीन वेळा लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने धाड टाकून पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. आता पुन्हा एकदा पोलीस हवालदार  शिवाजी वनखंडे हे 25 हजाराची लाच घेताना  1 जून रोजी रात्री रंगेहात सापडले आहेत.

तर गत वर्षी सोलापूर ग्रामीण पोलिस पथकाने टाकलेल्या धाडीत चक्क जुगार खेळताना पोलिस कर्मचारी सापडला होता. कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षकास निलंबित करण्यात आले होते. तर काही व्यक्तींना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून आर्थिक तडजोड करण्याचे काम करकंब पोलीस ठाण्यातून होत असल्याची तक्रार वरिष्ठांपर्यंत केल्याने अन्य एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. यापूर्वी करकंबलाच एका पोलीस कर्मचाऱ्याने सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवल्याचे उघड झाले होते. 2 जून रोजी वाळू वाहतूक करणारा एक टिपर सापडला असून, तोसुद्धा पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांचा असल्याची चर्चा आहे. 

पोलिसांचीच खाजगी सावकारी, फिर्यादिस धमकावणे, खोटे गुन्हे दाखल करणे, यासह अनेक ढीगभर तक्रारी घेऊन लोकांनी मुंबईत आंदोलने केली आहेत.  3 वर्षांपूर्वी याच पोलिस ठाण्यातील गोदामास संशयास्पद रित्या आग लागली होती. त्यामुळे गेल्या 5, 6 वर्षात गुन्हेगारामुळे कमी तर पोलिसांच्याच गुन्हेगारी भानगडीमुळे करकंब पोलीस ठाणे बदनाम होत आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक एस विरेश प्रभू यांच्या कामगिरीबाबत लोकमानस प्रचंड समाधानी आहे, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे हे सुद्धा स्वच्छ आणि कर्तव्यदक्ष आहेत. मात्र तरीही करकम्ब पोलिसांच्याच गुन्हेगारीत घट होताना दिसत नाही.  त्यामुळे करकंब पोलिस स्टेशनाला आता कर्तव्याशी प्रामाणिक अशा पोलिस अधिकाऱ्यांची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत.