Wed, Aug 21, 2019 15:09होमपेज › Solapur › मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्रास सांघिक विजेतेपद

मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्रास सांघिक विजेतेपद

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 9:23PMसोलापूर :  प्रतिनिधी   

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सोलापूर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या 63 व्या 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय शालेय पोल मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी सांघिक विजेतेपद पटकावले.  वैयक्तिक क्रीडा प्रकारातही महाराष्ट्राचे चार खेळाडू बाजीगर ठरले आहेत.

 मुलींच्या रोप मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांकाचे सांघिक विजेतेपद पटकावले. प्रतिभा मोरे 16.750 गुण, आदिती करंबेळकर 16.550 गुण, हिमानी परब 16.150 आणि प्रणाली जगताप हिने 15.600 गुण पटकावले. एकूण 49.450 गुणासह महाराष्ट्राच्या मुलींनी प्रथम क्रमांकाचे सांघिक विजेतेपद पटकावले.

याशिवाय वैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे खेळाडू सागर राणे (16.400 गुण), अनिकेत गोळे (15.500 गुण), आदिती करंबेळकर   ( 16.475 ) आणि प्रतिभा मोरे हिने 16.425 गुण पटकाविले तसेच विद्याभारतीचा पंकज गारमा याने 14.050 आणि मध्य प्रदेशची खेळाडू सोनू मंडावल्या हिने 14.850 गुण मिळविले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात राणे, गोळे, करंबेळकर आणि मोरे हे चार खेळाडू बाजीगर ठरले.
या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, विद्या भारती, दादरा नगर हवेली, सीबीएससी, गुजरात, गोवा, तेलंगणा या राज्यांतील प्रत्येक संघातील 4 मुले, 4 मुली, 1 पुरुष प्रशिक्षक आणि 1 महिला प्रशिक्षक तसेच 1 व्यवस्थापक असे सर्व मिळून 88 खेळाडू सहभागी झाले होते. याशिवाय एकूण 16 पंच काम पाहत आहेत. 

सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडला.मनपाचे क्रीडाधिकारी नजीर शेख आणि सिंहगडचे प्रमुख संजय नवले यांच्या हस्ते रोप आणि पोल मल्लखांब स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्र, विद्याभारती, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्य संघांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, विश्‍व मल्लखांब फेडरेशनचे सचिव उदय देशपांडे, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार दिलीप गव्हाणे, डॉ. एस.डी. नवले, सुजान थॉमस, राकेश घाटगे, प्रशांत कुलकर्णी, डॉ. करीम मुजावर, गणेश खंडागळे, राज्य मल्लखांब संघटनेचे पांडुरंग वाघमारे,  विश्‍वतेज मोहिते, खजिनदार बापू समलेवाले, राष्ट्रीय मल्लखांबचे निरीक्षक विकास फाटक, क्रीडा मार्गदर्शक सुजित शेंडगे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या माया मोहिते, राष्ट्रीय पंच भूपेंद्र मालपुरे, एन. रामचंद्रन, सोलापूर जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव, धनाजी पाटील, सुनील सवणे, राजू माने, सुहास छंचुरे, राजू प्याटी, हणमंत कदम, बाळासाहेब शिंदे, जुबेर शेख, मेजर  नीलकंठ शेटे, रतीकांत म्हमाणे, अनिल देशपांडे, पाटील आदी या स्पर्धेवेळी उपस्थित होते.