Sun, Jul 21, 2019 14:48
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पल्स पोलिओ मोहिमेत ग्रामीण भागात 91 टक्के बालकांना लाभ

पल्स पोलिओ मोहिमेत ग्रामीण भागात 91 टक्के बालकांना लाभ

Published On: Jan 28 2018 10:16PM | Last Updated: Jan 28 2018 9:56PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत शहर व जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहीम घेण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील 91 टक्के बालकांना लसीचा लाभ झाला. पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम घेण्यात आली. ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत, तर शहरी भागात महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात आली. 

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे व उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. अभिमन्यू खरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अणदूरकर यांनी बालकांना पोलिओची मात्रा देऊन मोहिमेचा शुभारंभ केला.

जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील 5 वर्षांखालील एकूण 3 लाख 62 हजार 436 बालके आहेत. ग्रामीण भागात 2410, तर नागरी भागात 210 लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली होती. याशिवाय 97 मोबाईल टीम, 111  ट्रांझिट टीमची सोय करण्यात आली होती. जिल्ह्यात जवळपास 91 टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले.

मनपातर्फे शहरात मोहीम

मनपातर्फे शहरात सर्वत्र मोहीम राबविण्यात आली. शहरात पाच वर्षाखालील 1 लाख 29 हजार बालके आहेत. याकरिता 340 लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली होती.  याशिवाय 75 ट्रांझिट टीम, 22 मोबाईल टीमचा समावेश होता. एकूण 1 हजार 175 लोकांची मदत घेण्यात आली. 75 पर्यवेक्षक मोहिमेवर लक्ष ठेऊन होते.  अश्‍विनी, यशोधरा, सोलापूर मार्कंडेय रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफ, एनसीसी, अंगणवाडी कर्मचारी यांची मदत घेण्यात आली. उपायुक्‍त त्रिंबक ढेंगळे-पाटील, आरोग्य समितीचे सभापती संतोष भोसले, स्थापत्य समितीचे सभापती विनोद भोसले, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली शिरशेट्टी, एनएचयुएमचे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्‍वर बोरगे यांच्या उपस्थितीत डफरीन चौकातील राजमाता अहिल्यादेवी प्रसूतीगृहात या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. रेल्वेस्टेशन तसेच एस.टी. स्टँड आदी ठिकाणीही लसीकरणाची सोय करण्यात आली होती.