Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Solapur › बेकायदा सावकारीचा ‘पाश’ आवळला जातोय

बेकायदा सावकारीचा ‘पाश’ आवळला जातोय

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 10:08PMसोलापूर  रामकृष्ण लांबतुरे 

शहर असो की ग्रामीण भाग, बेकायदा सावकारीचा ‘पाश’ आवळला जातोय, त्यामुळे अनेकजण जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग स्वीकारतात. घटना घडते, त्यावेळेसच आवाज उठतो, परत कालांतराने या बेकायदेशीर सावकारीचा विसर पडतो.  

अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन ग्रामीण भागात बेकायदेशीर सावकारी बोकाळल्याचे ऐकले होते. मात्र आता शहरातील शिकलेला माणूसही या बेकायदेशीर सावकारीला बळी पडत असल्याचे भयानक सत्य समोर आले आहे. सहकार खात्याकडील उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकल्यास हे धक्‍कादायक चित्र समोर आले आहे. 

शहर व जिल्ह्यातून जिल्हा उपनिबंधकास प्राप्त झालेल्या  तक्रार अर्जातून सोलापूर शहरात 29 धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात कोरे चेक, बाँड सापडले. त्यानुसार बेकायदेशीर सावकारी कायद्यानुसार 18 जणांवर गुन्हा दाखल झाला. अक्‍कलकोटमध्ये पाच धाडी टाकून तीन, दक्षिण सोलापूरमध्ये तीनवर धाडी टाकून दोनवर, बार्शीत चारवर धाडी टाकून एकावर, सांगोल्यात दोनवर धाडी टाकून एकावर तर मोहोळमध्ये दोनवर धाडी टाकून दोघांवर असे 27 जणांवर गुन्हा दाखल झाले. शहर-जिल्ह्यात मे 2018 अखेर 47 धाडी टाकून 27 जणांवर गुन्हा दाखल केल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

बेकायदेशीर सावकारांच्या पिळवणुकीपासून कर्जदारांची सुटका करण्यासाठी, त्याचे उच्चाटन करण्यासाठी बेकायदेशीर सावकारी कायदा आहे. मात्र यासाठी कोण समोर येऊन तक्रार करीत नाही, आवाज उठवित नाही. त्यामुळे या बेकायदेशीर सावकारीचा पाश आणखी आवळला जात आहे. 

सावकारीचे काही ठळक नियम 

महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलमान्वये शेतकरी कर्जदारांना तारणी 9 टक्के व बिगर तारणी 12 टक्के आणि बिगर शेतकर्‍यांना 15 टक्के व विनातारणी 18 टक्के वार्षिक दराने अधिकतम व्याज आकारणी मर्यादित व्यवहार करावा. गहाण वस्तू ठेवून कर्ज द्यावयास असल्यास गहाण वस्तू ठेवणार्‍यास नमुना दहामध्ये पावती देण्यात यावी, सावकारास डिपॉझिट ठेवी स्वीकारता येणार नाहीत, सावकाराने कार्यक्षेत्रातच सावकारीचा व्यवसाय करावा, वेळोवेळी परवाना नूतनीकरण करुन घेतलेला असावा, कर्जाची परतफेड केल्यानंतर कर्जदारास नियम 18 प्रमाणे पावती देण्यात यावी, सावकाराने कर्जदारास पासबुक देणे बंधनकारक असून रजिस्टर ठेवून दिलेल्या पासबुकाबद्दल संबंधितांना पोहोच द्यावी, सावकाराचे परवान्यातील नावांसहित बोर्ड जेथे सावकारी धंदा करण्यात येतो त्या जागेवर दिसेल अशा ठिकाणी लावावा, त्यावर परवाना क्रमांक लिहून परवाना फ्रेम करुन ठेवावा, सावकाराचे नोंदणी रजिस्टरप्रमाणे नोंद करणे बंधनकारक आहे.