Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Solapur › साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

Published On: Jun 09 2018 10:58PM | Last Updated: Jun 09 2018 10:13PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत असून विविध विभागांतील कामांसाठी अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पाणी शुद्धीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या दूषित पाणी नमुन्याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना कळवून पाणी शुद्धीकरणाबाबत नियोजन करण्यात येत आहे.  दूषित पाणी रोखण्यासाठी प्रत्येक पाणी उद्भवाची पाहणी करुन प्रयोगशाळा अहवालानुसार सतत दूषित पाणीपुरवठा झाल्यास त्या त्या ग्रामपंचायतींना लाल व हिरवे कार्ड देण्यात आले आहेत. ब्लिचिंग पावडर, क्‍लोरन गोळ्या, द्रव कोरिन खरेदीसाठी सेस  फंडातून 4 कोटी 5 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता तपासण्यासाठी आढावा घेण्यात येत आहे. 

तालुका स्तरावर नेमण्यात आलेली आरोग्यपथके पुढीलप्रमाणे. कंसात वैद्यकीय अधिकार्‍याचे नाव ः उत्तर सोलापूर (डॉ. एस.पी. कुलकर्णी), दक्षिण सोलापूर (डॉ. डी.व्ही. गायकवाड), मोहोळ (डॉ. ए.डी. पाथरुडकर), मंगळवेढा (डॉ. एन.एम. शिंदे), सांगोला (डॉ. काझी), अक्कलकोट (डॉ. ए.एस. करजखेडे), माढा (डॉ. संतोष गायकवाड), करमाळा (डॉ. सागर गायकवाड), बार्शी (डॉ. एस.जे. जोगदंड), माळशिरस (डॉ. मोहिते), पंढरपूर (डॉ. इ.पी. बोधले). पाणी शुद्धीकरण, जलजन्य आजार आणि साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जोखीमग्रस्त गावांची यादी बनविण्यात आली आहे. जिल्हास्तर व तालुका स्तरावर वैद्यकीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना निकषाप्रमाणे औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात साथ नियंत्रण किट ठेवण्याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांना  सूचना देण्यात आल्या आहेत. 

प्रशिक्षण व साहित्यांचे वाटप साथरोग नियंत्रणासाठी आरोग्यविषयक साहित्यांचे वाटप प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना करण्यात आले आहे. अप्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.