होमपेज › Solapur › शासनाच्या योजना युवकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न 

शासनाच्या योजना युवकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न 

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:55PM सोलापूर : प्रतिनिधी   

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे युवा माहिती दूत उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त एम. बी. तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत आदी उपस्थित होते.  ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभानंतर बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी विविध परीक्षेत उत्तम यश मिळविणारे विद्यार्थी आणि गुणवंत कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत दुहेरी संवादातून शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यास समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याच्या हेतूने ‘युवा माहितीदूत’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेल्या किंवा निवडण्यात आलेले विद्यार्थी सहा महिन्याच्या कालावधीसाठी राज्य शासनाचे युवा माहिती दूत असतील. या कालावधीत किमान 50 प्रस्तावित लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी लागू असणार्‍या योजनांची माहिती देतील. युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्य शासनाकरीता काम करण्याचे महत्त्वाची संधी लोकांना मिळेल. युवा माहिती दूत अशी ओळख राज्य शासनाच्यावतीने त्यांना सहा महिन्याकरीता देण्यात येईल. ठरवून दिलेले काम दिल्यानंतर या युवा माहिती दूतांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या सहकार्याने मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.