Mon, Jul 22, 2019 14:17होमपेज › Solapur › अल्पवयीन चोरांकडून लाखाचा ऐवज जप्त

अल्पवयीन चोरांकडून लाखाचा ऐवज जप्त

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 9:54PMसोलापूर : प्रतिनिधी

 अल्पवयीन चोरांची टोळी विजापूर नाका भागात पोलिसांना हाताला लागली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.विजापूर नाका झोपडपट्टी येथे पेट्रोलिंग करत असताना दोन अल्पवयीन बालक हे संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले. त्यामधील एक बालक सोनी कंपनीचा एलसीडी टीव्ही  विक्रीकरिता घेऊन जात होता.त्याची अधिक चौकशी केली असता त्याने टीव्ही चोरी केल्याचे कबूल केले.तसेच त्याची झडती घेतली  असता त्याच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाईल आढळला. तो मोबाईलदेखील बाजार समितीच्या मतमोजणीवेळी एसआरपी कॅम्प येथे झालेल्या गर्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने मोबाईल चोरीचे गुन्हे कबूल केले. घरफोडीतून चोरी केलेले एलसीडी, सात मोबाईल हँडसेट असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तर दुसरा विधीसंघर्षग्रस्त बालक हा दागिने विकण्यासाठी जात होता.जुना विजापूर नाका येथे तो थांबला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन  अधिक माहिती घेतली असता चार ते पाच दिवसांपूर्वी होटगी रोड परिसरात घरफोडी केली असल्याचे कबूल केले व त्या घरफोडीमधील दागिने असल्याचे सांगितले. पोलिस या दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन अधिक चाौकशी करत आहेत.नेकलेस, कर्णफुले, एक अंगठी असे एकूण 80 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले. ही कामगिरी पोसई बनकर, सफौ खरात, भालशंकर, तोळनुरे, निकम, जाधव आदींनी केली.

दामिनी पथकातील महिला पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

 दामिनी पथकातील महिला पोलिस बीट मार्शल पूनम काळे यांना विष देऊन  ठार मारण्याच्या प्रयत्न केला असल्याचा गुन्हा जेलरोड पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. रामेश्‍वरी शाम काळे (वय 24, रा. मुळेगाव,  दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

विलास सर्जेराव शिंदे, भीमा काळे, शोभा विलास शिंदे व विलास शिंदे यांच्या दोन्ही बहिणी यांनी वेळोवेळी सतत त्रास देऊन पैशांची मागणी केली होती. संशयित आरोपी  विलास शिंदे हा महिला पोलिस पूनम काळे यांच्याकडून वेळोवेळी पैशाची मागणी करत होता. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विलास शिंदे हा पोलिस मुख्यालय वसाहतीमध्ये जाऊन  पूनमला विषारी औषध पाजले व तेथून पोबारा झाला, अशी फिर्याद रामेश्‍वरी काळे हिने जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तपास पोसई बेंबडे करत आहेत.

मोबाईल घेऊन लंपास

चंदन दत्तात्रय धडे (वय 18, रा. महात्मा फुलेनगर, मजरेवाडी, सोलापूर) याचा मोबाईल अक्षय पारवे (रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) याने पार्क स्टेडियमवर फोन करण्यासाठी मोबाईल घेतला. तोंडओळख असल्याने फिर्यादीने विश्‍वासाने मोबाईल दिला. परंतु अक्षय पारवे याने विश्‍वास संपादन करुन घेतलेला मोबाईल परत न देता लंपास केला आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल झाली असून तपास पोसई घोडसे करत आहेत.

अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर व चालकास अटक

कुंभारी नाका येथे  गुरुवारी  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणार्‍या नसरुद्दीन चांदसाब नदाफ (वय 32 रा. टाकळी, दक्षिण सोलापूर) याला पोलिसांनी टिप्परसह अटक केली आहे. शिवानंद लिंगप्पा दुधभाते हा फरार झाला आहे. टिप्परचालकाने 3 ब्रास वाळू शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता अवैधरित्या वाहतूक केली आहे. पोलिसांनी टिप्पर व वाळूसह 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोह काळे करत आहेत.

65 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

जुना विडी घरकुल पोगुलनगर येथील नारायण बंगरय्या बत्तुल (वय 62) यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी गुरुवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास 65 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. भिंतीच्या रॅकमध्ये असलेल्या कपाटामध्ये कपड्यांच्या खाली मौल्यवान दागिने ठेवले होते.चोरट्यांनी चाव्या घेऊन घरातील कपाटामधील व भिंतीच्या रॅकमधील दागिने लंपास केले. या चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून अधिक तपास पोसई भोसले करत आहेत.