Fri, May 24, 2019 09:03होमपेज › Solapur › ३३ वीरपत्नींना एसटीचा मोफत प्रवास

३३ वीरपत्नींना एसटीचा मोफत प्रवास

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:30PMसोलापूर : इरफान शेख

सीमेच्या रक्षणासाठी जिवाची आहुती देणार्‍या जवानांच्या वीरपत्नींना राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 33 वीरपत्नींना या मोफत प्रवासाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत ही मोफत प्रवास सवलत वीरपत्नींना मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील 639 वीरपत्नींना आजीवन मोफत पास देण्यात आले आहेत.

देशाच्या सीमेवर शहीद होणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना आणली आहे. त्यानुसार वीरपत्नींना एसटी प्रवासासाठी मोफत पास देण्यात येत आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील 90 वीरपत्नींना पास देण्यात आले, तर सोलापूर जिल्ह्यातील 33 वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. एसटीच्या सर्व बसमधून या वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. 

या योजनेत राज्यातील 639 वीरपत्नींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात कोल्हापूरमध्ये 78, पुणे 75, सांगली 71, मुंबईत 12 पास सुपूर्द करण्यात आले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात हे पास वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी-30, सिंधुदुर्ग-30, अहमदनगर-29, रायगड (पेण)-16, मुंबई-12, ठाणे-17, नाशिक-16, औरंगाबाद-15, बीड-15, लातूर-15, बुलढाणा-13, उस्मानाबाद-10, धुळे-9, अकोला-9, अमरावती-9, जळगाव-8, यवतमाळ-8, नागपूर-8, परभणी-6, भंडारा-6, नांदेड-5, वर्धा-3, चंद्रपूर-1, गडचिरोली-1, जालना-1. सर्वात जास्त पासेस सातारा, तर सर्वात कमी पासेस चंद्रपूर, गडचिरोली व जालना जिल्ह्यात वितरित करण्यात आले आहेत. नजिकच्या काळात जास्तीत जास्त वीरपत्नींना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती एसटीच्यावतीने देण्यात आलेली आहे.