Fri, Jul 19, 2019 05:01होमपेज › Solapur › पोस्टाद्वारे दिलेला तीन तलाक न्यायालयाने फेटाळला

पोस्टाद्वारे दिलेला तीन तलाक न्यायालयाने फेटाळला

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 11:38PMसोलापूर : प्रतिनिधी

पोस्टाद्वारे तीन वेळा तलाक देत पत्नीशी विभक्ती मागणार्‍या पतीला सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयाने जोरदार चपराक मारली असून, 2014 मध्ये पोस्टाने पाठविलेला तलाक रद्द केला आहे. आजही लग्न अस्तित्वात आहे, असा निकाल कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी दिला आहे. पत्नीने माझ्या नावाचा उपयोग करू नये, असे पतीचे म्हणणे होते; परंतु कौटुंबिक न्यायालयाने लग्न अस्तित्वात आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सोलापुरातील अफसाना या युवतीचा विवाह 26 जून 2011 रोजी सर्फराज अहमद पटेल यांच्यासोबत गोदूताई विडी घरकुल येथे मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. सर्फराज हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. घरगुती कारणास्तव दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाची भांडणे झाली होती. पती सर्फराज पटेल याने पत्नीविरोधात 10 एप्रिल 2012, 24 एप्रिल 2012, 13 मे 2012, 25 मे 2012 या तारखांना अफसानाच्या घरी तक्रारी नोटिसा पाठविल्या होत्या. शेवटचा उपाय म्हणून सर्फराज पटेल याने  एका खासगी वकिलामार्फत 18 मे 2014, 18 जून 2014 व 18 जुलै 2014  रोजी असे तीन महिन्यांत पोस्टामार्फत तीनवेळा तलाक दिले असल्याचे पत्र पाठविले.

पीडित अफसाना हिने 25 मे 2015 रोजी कौटुंबिक न्यायालयात सर्फराज पटेल यांच्याविरोधात खटला दाखल केला. पतीनेदेखील पत्नीविरोधात खटला दाखल केला. या खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन अफसाना व सर्फराज यांचा विवाह वैध असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला असून पोस्टाने पाठविलेला तीन तलाक रद्द केला आहे. दोघे पती-पत्नी आजदेखील लग्नाच्या बंधनात आहेत, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे तसेच अफसाना ही सरफराजची कायदेशीर पत्नी आहे व तिला आपल्या नावासमोर पतीचे नाव लावण्याचा अधिकार आहे, असेही आपल्या निकालपत्रात नमूद केलेले आहे. या खटल्यात अफसाना पटेल हिच्याकडून अ‍ॅड. शिरीष जगताप, अ‍ॅड. कुणाल वाघमारे यांनी काम पाहिले, तर पती सरफराज पटेल यांच्यातर्फे अ‍ॅड. महमंद सलीम खतीब यांनी काम पाहिले होते.