होमपेज › Solapur › जिल्हा दूध संघात अधिवेशनानंतर खांदेपालट?

जिल्हा दूध संघात अधिवेशनानंतर खांदेपालट?

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 12:13AMसोलापूर : महेश पांढरे 

सोलापूर जिल्हा सहकार दूध संघाच्या पदाधिकार्‍यांमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी याविषयी निर्णय घेण्याचे ठरविले असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. सध्या जिल्हा दूध संघ आर्थिक अडचणीत आहे. याबाबत शासनाने दुधदरात वाढ करणे अपेक्षित आहे. तसेच जिल्हा दूध संघाकडे अतिरिक्त होणारे दूध शासनाने खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र याकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे शासनाच्या उदासीन भूमिकेबाबत आता राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे. तसेच पक्षवाढीच्या दृष्टीने वरिष्ठांनी आता जिल्ह्यात काही फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा दूध संघावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असले तरी सध्या भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक त्याठिकाणी चेअरमन आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदा व्हावा, याचा विचार आता पक्षश्रेष्ठींनी केला आहे. त्यामुळे  या खांदेपालटाविषयी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा पक्षातील कट्टर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

सुरुवातीला राष्ट्रवादीचेच असणारे मात्र नंतर भाजपाकडून विधानपरिषदेवर गेलेले प्रशांत परिचारक सध्या पक्ष कार्यात सक्रीय नाहीत, तर मनोहर डोंगरे यांनी स्थानिक राजकारणातील अडचणींपासून दूर राहून समविचारी नेत्यांबरोबर संधान बांधून राजकीय वाटचाल चालू ठेवली आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे या दोन्ही नेत्यांना पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय करणार की नव्या लोकांना त्याठिकाणी संधी देणार हे काही दिवसांतच दिसून येणार आहे.