Tue, Mar 19, 2019 03:41होमपेज › Solapur › सिव्हिलमध्ये महिन्याअखेरीस डायलेसिस केंद्र

सिव्हिलमध्ये महिन्याअखेरीस डायलेसिस केंद्र

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 10:23PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात चालू महिन्याअखेरीस डायलेसिस केंद्र सुरू होत आहे. या केंद्रात रुग्णांना विविध योजनांद्वारे मोफत किंवा माफक दरात डायलेसिस करता येणार आहे.

धर्मादाय आयुक्‍तालयाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या जिल्हा नियोजन समित्यांतर्फे गरीब रुग्णांना माफक दरात सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डायलेसिस केंद्र उभारण्याचा उपक्रम धर्मादाय आयुक्‍तालय आणि जिल्हा नियोजन समित्यांनी हाती घेतला आहे. डायलेसिस केंद्राच्या उभारणीसाठी, कार्यान्विततेसाठी जिल्ह्यातील धार्मिक संस्था, सामाजिक, शैक्षणिक व अन्य संस्थांकडून निधी घ्यावा, असे आवाहन राज्य धर्मादाय आयुक्‍तांनी केले होते. त्यानुसार सोलापूर येथील प्रिसिजन उद्योग समूहाकडून दोन, तर मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांकडून एक अशा तीन डायलेसिस मशीन या केंद्रासाठी दानस्वरुपात देण्यात आल्या आहेत. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्याकडून एक आरओ प्लान्ट (पाणी शुद्धीकरण संच) देण्यात येणार आहे. 

‘ए ब्लॉक’मध्ये होणार केंद्र

शासकीय रुग्णालयाच्या ए ब्लॉक इमारतीत डायलेसिस केंद्राकरिता विभाग तयार करण्यात आला आहे. येत्या दहा दिवसांत या तीनही मशीनरी येथे बसविण्यात येणार असून त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. 

दहा कर्मचार्‍यांचे नियोजन

या डायलेसिस केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ व इतर कर्मचारी असा दहाजणांचा स्टाफ असणार आहे. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, दोन अनुभवी तंत्रज्ञ व चार ते पाच इतर कर्मचारी यांचा समावेश असेल. अनुभवी तंत्रज्ञांच्या मुलाखती 10 जूनपर्यंत होऊन त्यांना रुजू करण्यात येणार आहे.

सामाजिक दायित्त्वातून प्रिसिजनचा पुढाकार

या डायलेसिस केंद्रासाठी सामाजिक दायित्त्वाच्या भूमिकेतून प्रिसिजन उद्योग समूहाकडून डायलेसिसच्या दोन मशिनी देण्यात येणार आहेत. शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरुपातून एक डायलेसिस मशीन देण्यात येणार आहे.  

लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात यापूर्वी डायलेसिसची सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र या निर्णयानंतर या महिन्याअखेरीस डायलेसिस केंद्राद्वारे डायलेसिसची सेवा सुरु होणार आहे. डायलेसिससाठीचे शुल्क व प्रवासखर्च मोठा असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

 विशेषत: गरीब रुग्णांना आर्थिक भूर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागत होता. शासकीय रुग्णालयात ही सेवा सुरू होणार असल्याने रुग्णांची सोय होणार आहे. या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा. डायलेसिस केंद्राच्या शुभारंभाची तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.