Tue, Apr 23, 2019 02:31होमपेज › Solapur › स्वत:च दर ठरवून मागवली दरपत्रके

स्वत:च दर ठरवून मागवली दरपत्रके

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 10:42PMसोलापूर :

कार्यालयाकडे शासकीय वाहन असताना दुसरे वाहन भाडेतत्त्वावर लावणे हा गैरप्रकार आहे. त्याहून कहर करत जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून दुसरे वाहन नेमण्यासाठी स्वत:च दर ठरवून त्यासाठीचा मसुदा प्रसिध्द केला आहे. त्यामुळे एखादी वाहन एजन्सी कमी दराने वाहन देण्यासाठी तयार असली तरी जादा दराने दरपत्रके आल्याचे दिसून येत आहे. ज्यातून शासनाला नाहक भुर्दंड सहन करावा लागला आहे.

जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून  दुसरे वाहन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी 5 जुलै 2017 रोजी सहसंचालकांना पत्र पाठवले. त्यावर सहसंचालकांनी तत्काळ 6 जुलै 2017 रोजी हे वाहन घेण्यासाठी परवानगी दिली.  परंतु प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे यांनी वाहनांसाठी तात्काळ दरपत्रके मागवली नाहीत.  कारण येथील वाहनचालक लाडाप्पा  जयप्पा नडगम यांनी चारचाकी वाहन खरेदी केले नव्हते. यानंतर वाहनचालक नडगम यांनी 24 ऑगस्ट 2017 रोजी चारचाकी वाहन खरेदी केले आहे. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी 25  ऑगस्ट 2017 रोजी प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोडे यांनी वाहन नेमणुकीसाठी दरपत्रके मागवली. दरपत्रके स्वीकृतीची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2017  म्हणजे फक्त तीनच दिवस ठेवली. ज्यामुळे जास्त दरपत्रके येणार नाहीत आणि 29 ऑगस्ट 2017  रोजी याच कार्यालयातील निवृत्त वाहनचालक लाडाप्पा जयप्पा नडगम यांच्या गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सला नेमणुकीचा आदेश प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे यांनी दिला आहे. मात्र या सर्व प्रकारातून मर्जीतल्या लोकांना जगवण्यासाठी शासनाचे अनुदान लाटण्याचा कट तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

दुसरीकडे प्रतिदिन 80 कि.मी.पर्यंतच्या दौर्‍यासाठी 1100 रूपये आणि प्रतिदिन 80 कि.मी.पेक्षा जास्तच्या दौर्‍यासाठी 10 रूपये प्रति कि.मी. दर पध्दती असा दर स्वत:च या कार्यालयाने जाहीर केला आहे. तसेच दरपत्रकातील तुलनात्मक तक्ता पूर्ण करून श्री गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा दर मान्य करून त्यांना टेंडर दिले आहे. दरपत्रके उघडण्याकरिता समिती स्थापन केली नाही. केवळ स्वत:च्याच कार्यालयातील कर्मचार्‍यांनाच दरपत्रकावर स्वाक्षरी करावयास लावली आहे आणि हा सर्व खटाटोप मर्जीतल्यांसाठी सुरू असल्याची चर्चा याच कार्यालयात सुरू आहे.