Wed, Nov 14, 2018 06:40होमपेज › Solapur › पोलिस उपायुक्‍तांनी वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांना झापले

पोलिस उपायुक्‍तांनी वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांना झापले

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 10:52PMसोलापूर : प्रतिनिधी

शहर वाहतूक शाखेच्या भोंगळ कारभाराबाबत मंगळवारच्या दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वाहतूक शाखेसह पोलिस दलामध्ये चांगलीच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल पोलिस उपायुक्‍त  नामदेव चव्हाण यांनी घेत  शहर  वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना चांगलेच फैलावर घेत कर्मचार्‍यांच्या शहरातील पेट्रोलिंग (गस्त) बंद करून त्यांना फिक्स पॉईंट म्हणजेच चौकामध्ये वाहतूक सुरळीत करण्याच्या कामावर जाण्याचे आदेश दिले.

बिघडलेल्या वाहतुकीबाबत दै. ‘पुढारी’ मध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अधिकार्‍यांनी फोन करुन वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधल्याबाबत दै. ‘पुढारी’चे अभिनंदन केले. 
दरम्यान, या वृत्ताची दखल शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त चव्हाण  यांनी  घेत  शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक व कर्मचार्‍यांना तातडीने कार्यालयात बोलावून चांगलेच झापले. कर्मचारी पेट्रोलिंगच्या नावाखाली शहरातील महामार्गांवर थांबून जे काम करतात ते काम त्वरित बंद करण्यास सांगून कर्मचार्‍यांची पेट्रोलिंग बंद करुन त्यांना प्रत्येक चौकांत थांबून फिक्स पॉईंट करण्याचे आदेश दिले  तसेच वाहतूक शाखेकडून शहरात विविध सेक्टर करण्यात येऊन त्या त्या सेक्टरमध्ये अधिकार्‍यांना जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना अधिकार्‍यांनी तसेच कर्मचार्‍यांनी कसूर केली तर त्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.