Sat, Apr 20, 2019 09:59होमपेज › Solapur › मनपा बरखास्ती मागणीची सरकारकडून दखल 

मनपा बरखास्ती मागणीची सरकारकडून दखल 

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 10:00PMसोलापूर : प्रतिनिधी

सत्ताधार्‍यांच्या गटबाजीमुळे शहराच्या विकासावर परिणाम झाल्याने महापालिका बरखास्त करण्यात यावी, या अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या मागणीची  दखल राज्य सरकारने घेतली असून याबाबत मनपाकडून अहवाल मागविला आहे. 

सव्वा वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून पालकमंत्री विजयकुमार देशमुख विरुद्ध सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन गटांत वाद निर्माण झाला. या दोन गटांनी एकमेकांविरोधात शह-काटशहाचे राजकारण सुरू केल्याने मनपाच्या कारभारावर परिणाम झाला. यामुळे बजेट तीन महिने रखडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेऊन सोलापूरकरांनी मनपा निवडणुकीत भाजपला निवडून देऊन काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली खरी पण दोन गटांच्या वादामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. तीन दिवसाआड पाणीपुरवठा, कचर्‍याचा प्रश्‍न, डेंग्यूचा विळखा आदी प्रश्‍नांनी शहराला ग्रासले असताना मनपातील सत्ताधारी गटबाजीत मश्गुल आहेत. यामुळे मनपा बरखात करुन प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी अतुल्य सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास यन्नम (कामटे) यांनी नोव्हेंबरमध्ये जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. यानंतर त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवरदेखील याविषयी तक्रार केली होती. मनपा आयुक्त, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची समक्ष भेट घेऊनही निवेदन दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी ही बाब मनपाच्या अखत्यारितील असल्याने योग्य कार्यवाहीसाठी निवेदन मनपा आयुक्तांकडे पाठविले होते. यावर आयुक्तांनी विधानसल्लागारांकडून अभिप्राय मागविला होता. 

या अभिप्रायानुसार मनपा बरखास्तीचे अधिकार राज्य शासनाला असल्याने हे निवेदन मनपाने शासनाकडे पाठविले होते. या निवेदनाची दखल घेत शासनाने नुकतेच मनपाला पत्र पाठवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.