Fri, Jul 19, 2019 16:08होमपेज › Solapur › नगरसेवक सुरेश पाटील विषबाधेतून बाहेर

नगरसेवक सुरेश पाटील विषबाधेतून बाहेर

Published On: May 26 2018 10:38PM | Last Updated: May 26 2018 9:03PMसोलापूर : प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांपासून विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे विषबाधेपासून पूर्णपणे बरे झाले आहेत. येत्या काही महिन्यांत ते संपूर्णपणे बरे होतील, असा विश्‍वास आहे. 

पाटील हे गेल्या पाच-सहा टर्मपासून भवानी पेठ परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. अभ्यासू व आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. गतवर्षी मनपात सत्ता आल्यावर त्यांना सभागृहनेता हे महत्त्वपूर्ण पद देण्यात आले. या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलत असतानाच डिसेंबरमध्ये त्यांची प्रकृती बिघडली. 

मधुमेह असलेल्या पाटील यांना मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांना चालण्यात अडचणी निर्माण होऊन चालता येणे बंद झाले.  प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील पुणे हॉस्पिटलला हलविण्यात आले. तिथेही फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या हॉस्पिटलमध्ये उपचार होत असताना त्यांच्या शरीरात विष असल्याचे निष्पन्न झाले. ही विषबाधा की विषप्रयोग, असा खल निर्माण झाला. मुंबई पोलिसांनी याची नोंद घेऊन तपासाला सुरुवात केली. या हॉस्पिटलमध्ये पाटील यांच्यावर सात वेळा डायलेसिस करण्यात आल्यानंतर ते विषबाधेतून बरे झाले. 

बॉम्बे हॉस्पिटलमधून सोलापूरच्या वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांना दीड-दोन महिन्यांपूर्वी आणण्यात आले. तद्नंतर अश्‍विनी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 

 पायाच्या हालचाली होण्यासाठी सध्या त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. गेली अनेक महिने त्यांना नळीद्वारे द्रवरुपातून अन्न देण्यात येत होते. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याने आता त्यांना द्रवरुपातील अन्न बंद करुन खायला फळे देण्यात येत आहेत.  प्रकृती क्षीण झाल्यामुळे त्यांना मध्यंतरी नीट बोलताही येत नव्हते. पण प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आता त्यांना सावकाश बोलता येऊ लागले आहे. मंगेशकर रुग्णालयात सध्या त्यांच्यावर फिजिओथेरपी केली जात आहे. येत्या चार-पाच महिन्यांत पाटील यांना चालण्यायोग्य करण्याचा विश्‍वास डॉक्टरांनी वर्तविल्याचे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.  दरम्यान, नगरसेवकपद अबाधित राहण्यासाठी पाटील यांनी शुक्रवारी मनपा सभेला हजेरी लावली. यावेळी मनपा आवारात झालेली मोठी गर्दी पाहता पाटील यांच्या लोकप्रियतेची प्रचिती सर्वांना आली. शुक्रवारी सायंकाळी ते मनपातून आपल्या भवानी पेठेतील निवासस्थानी गेले. शनिवारी दिवसभर त्यांना भेटण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच नागरिकांची रिघ लागली होती. सोमवारी त्यांना पुन्हा मंगेशकर रुग्णालयात नेणार असल्याची माहिती  त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. लवकरच सुरेश पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय  होतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.