Tue, Jul 23, 2019 06:25होमपेज › Solapur › सभापती कोळींसह 8 जण ‘स्थायी’तून बाहेर

सभापती कोळींसह 8 जण ‘स्थायी’तून बाहेर

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 11:11PM सोलापूर  : प्रतिनिधी

महापालिका स्थायी समितीमधून शनिवारी विद्यमान सभापती संजय कोळी, रवी गायकवाड, शिवसेनेचे महेश कोठे, गुरूशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादीचे नागेश गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे मिळून एकूण 8 सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त झाले. 

सभापती संजय कोळी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा झाली. महापालिका स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे 8,  शिवसेनेचे 3, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा 1, बसपचा 1, एमआयएमचा 1 असे पक्षीय बलाबल आहे. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर गठीत झालेल्या स्थायी समितीमधील 8 सदस्य हे एका वर्षानंतर निवृत्त करण्यात येतात. याकरिता चिठ्ठी काढण्याची पद्धत आहे. गतवर्षी मनपात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली होती. त्याला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे. शनिवारी समितीच्या सभेत 16 सदस्यांच्या नावे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. नगरअभियंता कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपीक, गजेंद्र गुटाळ, मनपा शाळा नं. 8 मधील चौथीचा विद्यार्थी परशूराम गुजराती, भक्ती चव्हाण या तीन व्यक्तींच्या हस्ते या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये विद्यमान सभापती संजय कोळी, भाजपचे रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, मीनाक्षी कंपली, शिवसेनेचे महेश कोठे, गुरूशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादीचे नागेश गायकवाड, एमआयएमच्या भक्ती चव्हाण यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. 

आपल्या नावाची चिठ्ठी निघू नये याकरिता अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. एवढेच नव्हे ‘घात’वारी ही सभा होणार असल्याने त्यात बदल करुन ही सभा एक दिवस उशिरा घेण्याचा खटाटोप  करण्यात आला. शनिवारी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपती ‘पावेल’ अशी अनेकांची धारणा होती. यातील काहींना मात्र देव पावला.  ‘घात’वाराचा धसका घेतलेल्या एका सत्ताधारी सदस्याला घातवारानंतरचा दुसरा दिवस म्हणजे शनिवारही ‘प्रतिकूल’ ठरला.  यामुळे या सदस्याचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून आले.  नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, मनिषा हुच्चे, राजश्री बिराजदार, शिवसेनेचे विठ्ठल कोटा, काँग्रेसचे प्रवीण निकाळगे, नरसिंग कोळी, बसपचे आनंद चंदनशिवे या 8 सदस्यांच्या नावाच्या चिठठ्या न निघाल्याने या सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.