Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांना भाजपमधूनच विरोध!

सहकारमंत्र्यांना भाजपमधूनच विरोध!

Published On: May 26 2018 10:38PM | Last Updated: May 26 2018 9:10PMसोलापूर : प्रतिनिधी

 सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजकीय धोरणाला विरोध करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व माजी आ. सिद्रामप्पा पाटील हे दोघेही सहकारमंत्र्यांविरोधात निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे  सहकारमंत्र्यांना  भाजपचा दुसरा गटच शह देणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सात रस्ता येथील निवासस्थानी शनिवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे व जिल्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांनी शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भातील राजकीय चर्चा केली. सहकारमंत्र्यांकडून गलिच्छ प्रकारचे राजकारण होत असल्याने याविरोधात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून रात्री पुन्हा या विषयावर सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून मार्गदर्शन होणार असल्याचे सांगण्यात आले. 

बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सहकारमंत्र्यांनी बाजार समितीच्या आजी-माजी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून या संचालकांविरुद्ध असणार्‍या आरोपांविरोधात दाद मागण्यात येईल. निवडणुकीचा कार्यक्रम जरी जाहीर झाला तरी बाजार समितीच्या प्रमुख नेत्यांचा अर्ज सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात येणार असल्याचे सुरेश हसापुरे यांनी सांगितले. 

बाजार समितीच्या आजी-माजी संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याने त्यांना निवडणूक कालावधीत अर्ज दाखल करता येऊ नये, यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 
मात्र, अशाप्रकराचे राजकारण कधीच झाले नसल्याचे हसापुरे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत सहकारमंत्री यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार असून या निवडणुकीत सहकारमंत्र्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असे त्यांनी सांगितले.