Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Solapur › पर्यावरणाच्या प्रश्‍नांवर वृक्षारोपण उत्तर : जिल्हाधिकारी

पर्यावरणाच्या प्रश्‍नांवर वृक्षारोपण उत्तर : जिल्हाधिकारी

Published On: Mar 14 2018 12:48AM | Last Updated: Mar 13 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी 

राज्याच्या वनविभागाने यंदा 13 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने भाग घ्यावा.  वृक्षारोपण लोकचळवळ बनल्यास पर्यावरणाच्या प्रश्‍नांवर मात करता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

सोलापूर वनविभागातर्फे आयोजित वृक्षलागवड जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय माळी, सहायक वनसंरक्षक हरिश्‍चंद्र वाघमोडे, सुवर्णा माने आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले पुढे  म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाची वृक्षलागवड योजना महत्त्वाची आहे. याला लोकचळवळीचे रुप देऊन जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे. केवळ वृक्षलागवड न करता वृक्षसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे.

डॉ. राजेंद्र भारूड यांनी गेल्यावर्षी पाच लाख वृक्षलागवडीचे लक्ष्य असतानाही नऊ लाख वृक्षलागवड केल्याबद्दल संजय माळी यांचे अभिनंदन केले. यावर्षीही जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षलागवड करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

उपवनसंरक्षक संजय माळी यांनी वृक्षलागवड उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. वृक्षलागवड महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सोलापुरात केवळ दोन टक्के वनक्षेत्र आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 33 टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्याला सुमारे 16 लाख वृक्षलागवडीचे लक्ष्य दिले आहे. वनविभागाने त्यासाठी 27 लाख रोपे तयार ठेवली असून त्यापेक्षाही जास्त म्हणजेच 22 लाख वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वृक्षाची ऑनलाईन माहिती शासनाला पाठवण्यात येईल. त्यासाठी जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे तसेच ग्रीन आर्मीच्या माध्यमातून वृक्षारोपण उपक्रम चालवण्यात येणार आहे, असे  माळी यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते जिल्हास्तरीय संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यामध्ये वनक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मेंढापूर (ता.पंढरपूर) यांना प्रथम क्रमांक, काळमवाडी (ता. माळशिरस) यांना द्वितीय, तर बागलवाडी (ता. सांगोला) या गावाला तृतीय पुरस्कार देण्यात आला.

सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमास पोलिस निरीक्षक रवी घोडके, सहायक वनसंरक्षक रमेश नागटिळक, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, आर. व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते.