होमपेज › Solapur › दातृत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी

दातृत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:27PMआरोग्य विश्‍व : बाळासाहेब मागाडे

दान करणे हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. दानाच्या उदात्त हेतूमुळे सामाजिक विकासाचा सेतू अधिक भक्कम होत असतो. ही दानाची परंपरा अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी अनेक संस्था, संघटना, व्यक्ती आपापल्यापरिने प्रयत्न करीत असतात. अलीकडील कॉर्पोरेट युगात सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) हा महत्त्वाचा उपक्रम या दानाच्या प्रक्रियेला बळ देत आहे. अर्थात, अनेक कंपन्या, उद्योग समूहांकडून सीएसआर हा उपक्रम कायदेशीर जबाबदारीचा एक भाग म्हणून पार पाडला जात असला तरी त्यातून काही चांगले घडण्याची आशा निर्माण होते, हेही महत्त्वाचे आहे. अशाच उत्तरदायित्त्वाच्या भावनेतून सोलापुरातील प्रिसिजन फाऊंडेशनने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात डायलेसिस युनिट उभारणीत सिंहाचा वाटा उचलला. या युनिटसाठी प्रिसिजनने दोन मशिनी दान केल्या. यातूनच प्रेरणा घेत शेकडो हात मदतीसाठी धावले आणि तीन मशिनीच्या सहाय्याने हे अद्ययावत डायलेसिस युनिट आता कार्यान्वित झाले आहे. खरेतर सोलापूरचे शासकीय रुग्णालय हे सोलापूर शहर व जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश सीमा भागातील रुग्णांसाठी जणू वरदायिनी ठरले आहे. या रुग्णालयात दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण ओपीडीसाठी येतात. त्यातील जवळपास दीडशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. दररोज तीस ते चाळीस महिला येथे बाळंत होतात. 

त्यापैकी 15 सिझर ऑपरेशन होतात. इतर 25 ते 30 ऑपरेशन येथे होतात. या रुग्णालयाचा व्याप पाहता येथे डायलेसिस युनिटची खूप गरज होती. ही गरज पूर्ण होण्याकामी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना झाल्यानंतर याला मूर्त स्वरुप प्राप्त झाले. माजी विद्यार्थी संघटनेने वर्गणी जमा करुन 15 लाखांची एक डायलेसिस मशीन दिली.  त्यातूनच हे युनिट आकारास आले. हे युनिट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी आणखी सात मशिनींची गरज आहे. या सात मशिनी खरेदी करण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील अनेक दाते पुढे येऊ लागले आहेत. ही सुखावणारी बाब आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने एक लाखाची मदत देऊ केली आहे. शिवाय वैयक्तिक पातळीवर अनेक व्यक्ती, संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. असे सार्वजनिक हिताचे काम यशस्वी होण्यासाठी खमक्या प्रमुखाची गरज असते. ती गरज अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या नेतृत्वामुळे पूर्ण होऊन या रुग्णालयात एक चांगला पायंडा पडू पाहात आहे. खरेतर शासकीय रुग्णालयात यापूर्वी खूपच नकारात्मक वातावरण होते. 

हे वातावरण सकारात्मकतेत रुपांतरित करण्याचे मोठे काम डॉ. घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करीत आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. या डायलेसिस युनिटमुळे अत्यंत माफक दरात किंबहुना मोफत स्वरुपात ही सेवा डायलेसिस रुग्णांना मिळणार आहे. या सेवेत गतिमानता प्राप्त होण्यासाठी आता समाजातील सर्वच स्तरांतील घटकांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे, इतकेच.