Mon, May 20, 2019 10:39होमपेज › Solapur › ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव साजरा करा 

‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव साजरा करा 

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल अनेकांना लागली आहे. या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयात मध्यवर्ती मंडळासह इतर पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपस्थितांना पोलिस आयुक्तांनी केले.

श्री गणेशोत्सवाच्या आगमनाप्रित्यर्थ घ्यावयाची काळजी, सूचना जाणून घेण्यासाठी गुरुवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, शांतता कमिटी सदस्य, पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस  उपायुक्त पौर्णिमा चौगुले, मधुकर गायकवाड, महावरकर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना पोलिस आयुक्तालयाच्यावतीने ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती करणारे माहिती पत्रकही वाटण्यात आले. 

यावेळी अनेकांनी महापालिका आणि वीजवितरण विभागाविषयी तक्रारी मांडल्या. मिरवणूक मार्गातील खड्डे, विष्णूघाटात स्वच्छ पाण्याची सोय, विद्युत विभागाकडून वीजपुरवठा करत्यावेळी असलेली किचकट प्रक्रिया, मिरवणूक मार्गावरील केबल वायर, झाडांच्या फांद्या काढण्याबाबत सूचना केल्या. 

होम मैदान मूर्तीकार संघटनेचे आणि पुंजाल मैदान, शांती चौक मूर्ती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्याठिकाणी महापालिकेकडून मिळणार्‍या सोयीबाबत नाराजी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, दलदलयुक्त जागेत मुरूम टाकण्याची सोय करण्याची मागणी केली. यावर महापालिका आयुक्तांनी सर्व सोयी करुन देण्याचे आश्‍वासन दिले, मात्र पिण्याच्या पाणीची सोय आपापल्यावतीने करावी, उत्पन्न मिळवत असताना आपल्या सोयी आपण कराव्यात, अशा सूचना दिल्या. 

यावेळी काही मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीला गणपती मंडळांनी पुढाकार घेवून धन, धान्याच्या स्वरूपात मदत करावी, तसेच फलक लावून मदत गोळा करुन मदत पोहच करण्यासाठी प्रयत्न करण्याची कल्पना मांडली. यास पोलिस आयुक्तांनी प्रतिसाद देत आपणही यास पोलिस प्रशासनाच्यावतीने मदत करु, असे आश्‍वासन दिले.  मंडप परवाने लवकर मिळावे, अशी मागणी केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी आणखी 19 दिवस गणेशोत्सवास अवकाश आहे, तरीही उद्यापासूनच एक खिडकीमधून परवाने मिळण्याची सोय करुन देण्याचे आश्‍वासन दिले.  यावेळी दास शेळके, भाऊराव भोसले, विजय पुकाळे, देवेंद्र भंडारे, संतोष उदगिरी, सूर्यकांत शेरखाने, शाम कदम, श्रेयस साका, लक्ष्मण गायकवाड, प्रताप चव्हाण, लक्ष्मीकांत गड्डम, रसूल पठाण यांनी सूचना मांडल्या.  या बैठकीस सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, वैशाली शिंदे, डॉ. दीपाली काळे, महावीर सकळे, चोपडे, दरेकर, संगीता हत्ती, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती. आठ मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकार्‍यांसह परिवहन सभापती तुकाराम मस्के, श्रीकांत घाडगे, अंबादास अमृतम, कुमार जगडेकर, आनंद  हत्तुरे, मूर्तीकार संघटनेचे अलिन खटावकर, गजेंद्र बांदेवाडीकर, अमर कणकी, शेखर मिठ्ठा, चंद्रकांत वग्गा, राजू गुंडला तसेच मंडळ पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.