Wed, Apr 24, 2019 07:33होमपेज › Solapur › सोलापूरच्या ३ नगरसेवकांवर टांगती तलवार

सोलापूरच्या ३ नगरसेवकांवर टांगती तलवार

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या निवडणुकीत जातनिहाय राखीव मतदारसंघांतून निवडणूक लढविलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतानाही त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा तीन नगरसेवकांवर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आहे.

सोलापुरातील शहाजिदा शेख (ओबीसी), सुभाष शेजवाल आणि अनुराधा काटकर (एनटी, पण ओबीसी) या तीन नगरसेवकांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून यापेक्षा अधिक नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या 33 पैकी 19 नगरसेवकांची नावे निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविल्यानंतर आता सोलापूर महापालिकेतील वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. या तीन सदस्यांनी केला नसल्याची माहिती महापालिका वर्तुळातून मिळाली आहे. याबाबत अनुराधा काटकर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी एक महिना उशीराने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याचे सांगितले. मात्र या विलंबाला जात पडताळणी कार्यालय दोषी असून त्यांनी वेळेत पडताळणी केले नसल्याचे सांगितले. नगरसेविका शहाजीदा बानो यांनीही सात महिन्यानंतर जात पडताळणी दाखला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी मात्र अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र दिले नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
------
सर्वोच्च न्यायालयाचा दणका

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र हे सहा महिन्यांत देण्याचे आदेश असून ते सहा महिन्यातच द्यावेत त्यानंतर एकदिवसही उशीर लागू नये, अन्यथा ते नियमात बसत नाही, असा निकाल दिल्याने आता हा नियम सर्वच नगरसेवकांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे आता सोलापूर महापालिकेतील तीन नगरसेवकांचे भवितव्य काय होईल, याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.