Thu, May 23, 2019 04:17होमपेज › Solapur › जिल्हा न्यायालयात ‘बॉम्ब’ची अफवा

जिल्हा न्यायालयात ‘बॉम्ब’ची अफवा

Published On: May 26 2018 10:38PM | Last Updated: May 26 2018 8:59PMसोलापूर : प्रतिनिधी

सकाळी 11 ची वेळ. पोलिस आयुक्तालयातील नियत्रंण कक्षातील फोन खणाणला. फोनवर तिकडून बोलणार्‍या व्यक्तीने जिल्हा न्यायालयात  बॉम्ब  असल्याची माहिती दिली अन् आयुक्तालयातील पोलिस यंत्रणा हलली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करुन जिल्हा न्यायालयाचा परिसर पिंजून काढूला अन् संशयित वस्तू शोधून काढली. 

बॉम्बशोधक व नाशक पथकातील कर्मचार्‍यांनी बॉम्ब निकामी केला अन् सर्वांनी सुटेकचा निःश्‍वास सोडला. शेवटी पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी हे प्रात्यक्षिक असल्याचे जाहीर केले.
शनिवारी  सकाळी 11 च्या सुमारास आयुक्तालयातील फोनवर एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा न्यायालयात बॉम्ब  असल्याची माहिती सांगितली. त्यावेळी नियत्रंण कक्षातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तत्काळ याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना  कळवून जेलरोड पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोणताही वेळ न गमवता जिल्हा न्यायालयात धाव घेतली. पोलिस  उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलिस आयुक्त परशराम पाटील, जेलरोडचे पोलिस निरीक्षक पवार, सुरक्षा शाखेचे निरीक्षक आगलावे यांच्यासह विविध पोलिस चौक्यांचे व राखीव पोलिस कर्मचार्‍यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.

यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून न्यायालयाचा परिसर पिंजून काढून संशयित बॉम्ब शोधून काढला. त्यावेळी बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक वेळापुरे व इतर कर्मचार्‍यांनी शोधलेल्या  बॉम्बच्या  वायरी व आयडी कापून तो निकामी केला. त्यानंतर पोलिस उपायुक्त गिते यांनी हे प्रात्यक्षिक असल्याचे घोषित केले. हा सर्व प्रकार सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान जिल्हा न्यायालयात घडला.