Fri, Jul 19, 2019 15:49होमपेज › Solapur › खालच्या पातळीवर आम्ही राजकारण करत नाही

खालच्या पातळीवर आम्ही राजकारण करत नाही

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 10:31PMसोलापूर  प्रतिनिधी

खालच्या पातळीवर जाऊन आम्ही राजकारण करीत नाही. आम्ही खेड्यात वाढलोय. संघर्ष तर आमच्या अंगवळणीच पडलाय. संघर्षाविना आम्हाला आजवर काहीच मिळालेले नाही. राजकारण काय असते, हे तुम्हाला दाखवून देऊ, अशी भूमिका घेत माजी आमदार दिलीप माने यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा चांगलाच समाचार घेतला.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर माने यांनी रविवारी दुपारी गोविंदश्री मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले,  मलाही खूप डाव खेळता येतात. योग्य त्या वेळी एक एक पत्ते ओपन करून राजकारण काय असते, ते तुम्हाला दाखवू. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आमचे अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केले. निवडणूक लढवायची की नाही, हे अद्याप ठरविले नाही. पण, तुमच्या नाकावर टिच्चून निवडणुकीसाठी आमचे अर्ज मंजूर करून घेतले. अशा शब्दांत माने यांनी ना. सुभाष देशमुख यांचा समाचार घेतला.

यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा-पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोपाळराव कोरे, माजी उपसभापती हरीश पाटील, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी माने पुढे म्हणाले, दिलीप माने एकदा मैदानात उतरला तर कधी मागून वार करीत नाही. सोसायट्या बरखास्त करून हद्दवाढ भागातील गावे वगळून निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात न्यायदेवतेने योग्य न्याय दिला. एका कोपर्‍यात पडलेल्या बाजार समितीत आम्ही काय केले, ते तेथील व्यापारी, कर्मचारी आणि शेतकर्‍यांना विचारा. मगच आमचे काम तुमच्या लक्षात येईल. आज त्या बाजार समितीत 60 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हे विसरू नका. एक ऑडीट पाचवेळा करून आम्ही 40 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा कांगावा होत आहे. पण, न्यायालयात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. गेल्या सात वर्षांनंतर समितीची निवडणूक होत आहे. या लोकांना निवडणूकच घ्यायची नव्हती. पण, आम्ही न्यायालयात जाऊन यांना निवडणूक घ्यायला भाग पाडली. यावेळी गोपाळराव कोरे, संजय गायकवाड, गुरुसिध्द म्हेत्रे यांचीही भाषणे झाली.

कोण काय म्हणाले- 

सत्तेसाठी खालच्या पातळीची परिसीमा : सुरेश हसापुरे 

निवडणूक जवळ आल्याने आम्हाला अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले. कै. वि. गु. शिवदारे, माजी मंत्री आनंदराव देवकते, कै. कमळे गुरुजी यांनी तालुक्याच्या शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले. पण, आज ज्या गोष्टी घडतायेत त्या तुमच्यासमोरच आहेत. आम्ही शेतकर्‍यांच्या विश्‍वासावरच ही निवडणूक लढवित आहोत. आम्ही बाजार समितीत काय केले, याचा नीटपणे अभ्यास करुन आमच्यावर आरोप करा. सत्तेसाठी खालच्या पातळीची परिसीमाच आज विरोधकांनी गाठली. कोणाचीही उमेदवारी फायनल झालेली नाही. श्रेष्ठी जो निर्णय घेतील, तोच सर्वांना मान्य असेल, असे सुरेश हसापुरे म्हणाले.

शेतकर्‍यांचे काय कल्याण केले : बाळासाहेब शेळके

तालुक्यातील नेतेमंडळींनी शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्था वाढविल्या. पण, आज शेतकर्‍यांचे हित पुढे करुन विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. शेतकर्‍यांना मताचा अधिकार दिल्याचे बोलले जाते. त्यापेक्षा शेतकर्‍यांचे काय कल्याण केले यावर बोलावे. शेतकर्‍यांचे हित पाहत असताना राजकारणात मर्यादा ठेवाव्या लागतात. पण, आज सर्वप्रकारच्या मर्यादा ओलांडल्या जात असल्याचे बाळासाहेब शेळके म्हणाले.

आ. म्हेत्रे यांनी दूरध्वनीवरुन साधला संवाद

दिलीप माने यांचे भाषण सुरु असतानाच आ. सिध्दाराम म्हेत्रे यांचा दूरध्वनी त्यांच्या मोबाईल फोनवर आला आणि त्यांनी दूरध्वनीवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझी प्रकृती ठिक नसल्याने मी अक्कलकोट येथील कृषी प्रदर्शन आणि बाजार समिती निवडणुकीसाठीच्या बैठकीला  उपस्थित राहू शकलो नाही. तुम्ही सर्वांनी एकदिलाने एक विचाराने काम करुन ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.