होमपेज › Solapur › सोलापूर बंदसाठी सर्व पक्ष, संघटना एकवटल्या

सोलापूर बंदसाठी सर्व पक्ष, संघटना एकवटल्या

Published On: Jul 28 2018 11:00PM | Last Updated: Jul 28 2018 9:49PMसोलापूर : प्रतिनिधी 

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी शहर बंदची हाक देण्यात आली असून बंदला आज सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. सोमवारी डी-मार्ट, बिग बझार या मॉल्ससह नवी पेठ व शहरातील इतर व्यापारीपेठाही बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे नेते दिलीप कोल्हे आणि प्रताप चव्हाण यांनी दिली.

सोलापूर बंदबाबत आज झालेल्या बैठकीला बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, आरपीआय नेते राजाभाऊ इंगळे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, माकपचे नेते सिध्दप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, देवेेंद्र कोठे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख, नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, मराठा महासंघाचे नेते दास शेळके, बाबासाहेब भोसले, हेमंत चौधरी आदी उपस्थित होते. 

सोलापूर शहर कडकडीत बंद ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांसह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला. मात्र बंद करताना  कोणत्याही व्यक्तीकडून हिंसक कृत्य घडू नये, याची दक्षताही सर्व पक्षांनी घेतली पाहिजे अन्यथा त्याचा गैरफायदा घेतला जाईल, असे आवाहन यावेळी सर्वच नेत्यांनी केले.