होमपेज › Solapur › पालकमंत्र्यांची सहकारमंत्र्यांना धोबीपछाड!

पालकमंत्र्यांची सहकारमंत्र्यांना धोबीपछाड!

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालासाठी मंगळवारी सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पच्या सभागृहात मतमोजणी घेण्यात आली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलची धोबीपछाड करणारे निकाल बाहेर पडत गेल्याने सहकारमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारीच मतमोजणी कक्षातून काढतापाय घेतला. दुपारी चार वाजेपर्यंत निकालाची उत्सुकता ताणली गेल्याने यावेळी मतदान केंद्राच्या सभोवताली कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 

सकाळच्या मतमोजणीदरम्यान हिरज गणातून माजी आमदार दिलीप माने व कुंभारी गणातील उमेदवार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विजयाचा निकाल बाहेर पडला. या निकालाने संपूर्ण निवडणूक चित्र स्पष्ट होत गेल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत सहकारमंत्री गटातील कार्यकर्त्यांनी हळूहळू मतमोजणी कक्षातून काढतापाय घेतला. 

मुस्ती गटातून निवडणुकीत उभे असलेले माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी निकाल जाणून घेण्यासाठी सकाळी आठ वाजताच मतदान केंद्रावर खुर्ची टाकून ठिय्या मारला. मात्र दुपारी बारापर्यंत त्यांच्याविरोधात निकाल गेल्याने त्यांनी येथून काढतापाय घेतला. या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीशैल नरोळे यांना येथे विजयी सलामी मिळाली. 

कंदलगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश हसापुरे व भाजपचे उमेदवार आप्पासाहेब पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाल्याचे अखेरपर्यंत दिसून आले. निकाल काहीच स्पष्ट होत नसल्याने यावेळी उमेदवार सुरेश हसापुरे यांनी काही मतमोजणी कक्षात हजेरी लावून नंतर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भंडारकवठे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब शेळके यांना मात्र  रुवातीपासूनच विजयी आकडेवारी मिळत गेल्याने ते शेवटपर्यंत मतदान केंद्रात थांबल्याचे दिसून आले. बोरामणी गणातील काँग्रेसचे उमेदवार राजकुमार वाघमारे व भाजपचे विक्रांत गायकवाड यांच्यात चांगलीच लढत झाल्याने दोघे शेवटपर्यंत येथे थांबले होते.

अखेरीस बाजार समितीचा निकाल लागल्याने महिनाभरापासून तापलेले राजकीय वातावरण शांत झाले आहे.अखेर ‘विजय’ मुख्यमंत्र्यांचाच ठरला ‘निकाल काही लागो ‘विजय’ मात्र मुख्यमंत्र्यांचा’च या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित करुन मुख्यमंत्र्यांची खेळी समोर आणली होती. मुख्यमंत्री यांच्या निर्णयानुसार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या निवडणुकीत उडी घेतली असून यात त्यांना यशही आल्याने अखेर पालकमंत्र्यांच्या नावातील ‘विजय’ व निवडणुकीतील ‘विजय’ सीएमचा ठरला.

पालकमंत्री ठरले ‘मॅन ऑफ द मॅच’

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधी पॅनेलमध्ये उभे राहून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घवघवीत विजय मिळवला. कुंभारी गणातून आपली अविरोध निवड होत असताना उमेदवार लादण्यात आल्याची चीड त्यांच्यात होती. निवडून आलेल्या संचालकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका त्यांनी निकालानंतर घेतली.  बाजार समितीच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सहकारमंत्री विरुद्ध पालकमंत्री असा संघर्ष दिसून आला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या आघाडीच्या पॅनलमधून पालकमंत्री देशमुखांनी आपली उमेदवारी दाखल केल्यादिवसापासूनच सहकारमंत्र्यांना दणका बसणार, याची चर्चा सुरु झालेली होती. त्यानूसारच निकालानंतर चित्र दिसून आले.