सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगात निर्माण होणार्या चादर-टॉवेलला वाव देण्यासाठी तसेच या जिल्ह्यात उत्पादित होणार्या डाळिंबापासून ज्यूस निर्मिती करण्याच्यादृष्टीने योगगुरू रामदेवबाबा सोलापुरात 17 ते 19 मार्च याकालावधीत संबंधितांच्या बैठका घेणार आहेत, अशी माहिती पतंजली परिवाराच्या सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली.
सोलापूर शहरातील चादर-टॉवेल उद्योग मागील काही वर्षात प्रचंड अडचणीत आहे. या उद्योगाला पतंजली परिवाराच्या मदतीने वाव देण्याचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने 17 ते 19 मार्च या कालावधीत सोलापूर दौर्यावर येत असलेले रामदेवबाबा हे बैठका घेणार आहेत. यंत्रमागधारकांशी संवाद साधण्याबरोबरच डाळिंब संशोधन केंद्राला भेट देणार आहेत. डाळिंब उत्पादकांसमवेत डाळिंबाचा ज्यूस, डाळिंबाच्या सालीपासून पावडर तसेच बियांपासून तेलऔषधी तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याबाबत चर्चा करणार आहेत.
पापड उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार
पतंजली परिवारातर्फे सध्या सोलापुरात पापड उद्योग सुरू करण्यात आला आहे. या उद्योगात महिलांना जास्तीत जास्त रोजगार देण्याची योजना आहे. विडी कामगारांना या योजनेत सहभागी करुन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. सोलापूरसाठी काही तरी करण्याचा रामदेवबाबांचा प्रयत्न आहे, असे सुधा अळ्ळीमोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.