Tue, Aug 20, 2019 04:19होमपेज › Solapur › ७० वर्षांच्या लाभार्थ्यासह आणखी ९ जणांना अटक

७० वर्षांच्या लाभार्थ्यासह आणखी ९ जणांना अटक

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:58PMसोलापूर : प्रतिनिधी

समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी आयुक्‍तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने 70 वर्षाच्या लाभार्थ्यासह आणखी 9 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्वांना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश अनभुले यांनी दिला.

अफजल कबीर मुजावर (वय 33, रा. मालवंडी, ता. बार्शी), अल्ताफ रहेमत तांबोळी (24, रा. बार्शी), रफीक शुकुर अत्तार (47, रा. बार्शी), दादासाहेब भगवान जवंजाळ (37, रा. वाफळे, ता. मोहोळ),  रफीक  महंमद तांबोळी (29, रा. वाफळे, ता. मोहोळ), बिभीषण  आप्पासाहेब अनपट (42), चिंतामणी गणपत खडसरे (70), ज्योतीबा गोविंद अवताडे (22), प्रकाश सर्जेराव परकाळे (32, चौघे रा. रांजणी) अशी  पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे  आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी सुमारे 21 आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये फिर्याद देणार्‍या समाजकल्याणच्या सहायक आयुक्‍त मनीषा फुले, घाटे हेदेखील आरोपी झाले आहेत. 

समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ऑनलाईन देण्यासाठी  पुण्याच्या  मास्टेक   कंपनीला आऊटसोर्स  करण्यात आले होते. आऊटसोर्सिंग  करण्यात आलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांनी संगणकाद्वारे ऑनलाईन शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या यादीत  फेरफार करून सन 2011 पासून ते 2014 पर्यंत  1 कोटी 17 लाख 93 हजार 178 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सन 2015 मध्ये सदर बझार पोलिस ठाण्यात समाजकल्याण विभागाच्या सहायक  आयुक्‍त  मनिषा देवेंद्र फुले   (वय 45, रा. सुदेष्णा विहार, सात रस्ता, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये सहायक आयुक्‍त मनिषा फुले, घाटे हेदेखील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून अपहाराची रक्‍कम 6 कोटी 27 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 30 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अमीर तांबोळीचा नातेवाईक असलेल्या रफीक अत्तार याच्या बँक खात्यावर 74 लाख रुपये पाठविण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या 9 आरोपींच्या खात्यांवर सुमारे 1 कोटी 10 रुपये वर्ग करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलरक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक साळुंखे व पोलिस उपनिरीक्षक शिवाजी जाधव तपास करीत आहेत.