Sat, Aug 24, 2019 22:14होमपेज › Solapur › ८० टक्के क्षेत्र ठिबकखाली आणा : ना. सुभाष देशमुख

८० टक्के क्षेत्र ठिबकखाली आणा : ना. सुभाष देशमुख

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 9:08PM

बुकमार्क करा
 सोलापूर : प्रतिनिधी 

सर्वाधिक साखर कारखाने म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यामध्ये पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच इतरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी येत्या काही वर्षांत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ऊसशेती ठिबकावर आणण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक पार पडली. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. बबनदादा शिंदे, अ‍ॅड. धनाजी साठे, अ‍ॅड. बी. बी. जाधव, सतीश जगताप यांच्यासह अनेक साखर कारखाने संचालक उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील उसाची शेती ही उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा सर्वाधिक वापर हा उसाच्या शेतीसाठी होत आहे तसेच भीमा आणि सीनाकाठच्या शेतकर्‍यांना या पाण्याचा उपयोग होत 

असून उर्वरित शेतकर्‍यांपर्यंत हे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे मोजक्याच लोकांना या पाण्याचा उपयोग होत आहे. त्यामुळे इतरांवर अन्याय होऊ नये यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करुन जास्तीत जास्ती शेती ओलिताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी आता नाबार्डच्या सहकार्याने कारखानदारांनी थेट शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नाबार्डसह विविध साखर कारखान्यांचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसशेती ही पाटाद्वारे पाणी देऊन केली जाते. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. हा अपव्यय टाळून कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्यासाठी आता शेतकर्‍यांनीही पुढे यावे त्यासाठी साखर कारखानदारांनी जबाबदारी घेऊन शेतकर्‍यांना 7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी कर्जपुरवठा करावा. यासाठी लवकरच मंजुरी घेऊ, असे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले.