Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Solapur › ५१ हजार शेतकर्‍यांसाठी दुसर्‍या टप्प्यात ६६ कोटी ८८ लाख रुपये

५१ हजार शेतकर्‍यांसाठी दुसर्‍या टप्प्यात ६६ कोटी ८८ लाख रुपये

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:42PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

राज्य शासनाने सुरु केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेकडील 31 हजार शेतकर्‍यांसाठी 170 कोटी रुपये शासनाने दिले होते. ते पैस शेतकर्‍यांचा नावावर जमा करण्यात आले असून आता दुसर्‍या टप्प्यात 51 हजार 517 शेतकर्‍यांसाठी आणखी 66 कोटी 88 लाख रुपये देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली.

राज्य शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेची घोषणा होऊन तीन महिने लोटली तरी शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याने विरोधकांनी चांगलाच कांगावा केला होता. त्यामुळे भाजप-सेना सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून याचे श्रेय विरोधी पक्षाला जाऊ न देण्यासाठी तत्काळ पैसे देण्याचा धडाका सहकारमंत्र्यांनी लावला आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील 31 हजार शेतकर्‍यांसाठी  जवळपास दोनशे कोटी रुपये जिल्हा बँकेला देण्यात आले होते. ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होतात. तोपर्यंत दुसर्‍या टप्प्यातील ही रक्‍कम बँकेला अदा करण्यात आली आहे. 

दुसर्‍या टप्प्यात शासनाकडे जवळपास 100 कोटी 36 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 66 कोटी 88 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे याद्यांची पडताळणी पूर्ण होताच थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेला कर्जमाफीपोटी आजतागायत जवळपास 350 कोटी रुपये मिळाले असून यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला या कर्जमाफीमुळे चांगले दिवस आले आहेत. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चा वादा केल्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला तरी किमान ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळासह शेतकर्‍यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.