Mon, Jul 22, 2019 04:41होमपेज › Solapur › ५७ वर्षांनंतर बाजार समिती मालामाल

५७ वर्षांनंतर बाजार समिती मालामाल

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 9:42PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सन 2017-18 या आर्थिक वर्षात एकूण 21 कोटी 51 लाख 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून गत 57 वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. बाजार फीच्या माध्यमातून तब्बल 16 कोटी 41 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे, सचिव मोहनराव निंबाळकर यांनी दिली. 

बाजार समितीच्या गत वर्षभरातील कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी सकाळी बाजार समितीत काकडे व निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी सहायक सचिव विनोद पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही नफ्यात असणारी एकमेव बाजार समिती आहे. गत वर्षभरात सेस उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. बाजार फी वसुलीमधील त्रुटी प्राधान्याने दूर करण्यात आल्या. बाजार समितीमधील  अडतदार व व्यापार्‍यांकडून दरवर्षी केवळ मार्च महिन्यात बाजार फी भरण्यात येत होती. मात्र यंदा फेब्रुवारीअखेर देय असणारी बाजार फी वसूल करण्यात आली. वसुलीत पारदर्शकता निर्माण झाल्याने वसुलीची आकडेवारी वाढली. जानेवारीअखेरपर्यंत केवळ 5 कोटी रुपयांची बाजार फी वसूल करण्यात आली होती. दोन महिन्यांतच सुमारे 15 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. 

मार्चअखेरपर्यंत गतवर्षी बाजार समितीत एकूण 1 हजार 44 कोटी रुपयांची उलाढाल झाली. विशेषता 624 कोटी रुपयांची उलाढाल केवळ कांदा विक्रीतून झाली. लासलगाव येथील शेतकर्‍यांचाही कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सन 2016-17 या आर्थिक वर्षात बाजार समितीत 910 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यात 240 कोटी रुपयांची उलाढाल कांदा विक्रीतून झाली होती. यावर्षी बाजार समितीला एकूण 16 कोटी 13 लाखांचे एकूण उत्पन्न मिळाले होते. तर बाजार फीच्या माध्यमातून 10 कोटी 63 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 

बाजार समितीच्या रकमा सुरक्षित राहाव्यात यासाठी 57 कोटी रुपयांच्या ठेवी राष्ट्रीय बँकेत ठेवण्यात आल्या आहेत. सहकारी क्षेत्रातील बँकातील चालू ठेवीही राष्ट्रीय बँकेत ठेवण्यात येत आहेत. तत्कालीन बाजार समितीच्या संचालक मंडळाने एका सूत गिरणीस 1 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज दिले. आजमितीस या कर्जापोटी 10 कोटी रुपयांची रक्कम सूत गिरणीकडून येणे अपेक्षित आहे. हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल किंवा तत्कालीन बाजार समिती संचालक मंडळाच्या स्थावर मिळकतीवर बोजा चढवूनही ही वसुली करण्यात येणार असल्याचे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले. 

सन 2017-18 या वर्षात भुसार बाजारातून 4 कोटी 95 लाख, गूळ बाजारातून 1 कोटी 15 लाख, फळे व भाजीपाला बाजारातून 2 कोटी 83 लाख, कांदा बाजारातून 8 कोटी 40 लाख, कडबा बाजारातून 50 हजार, जनावर बाजारातून 46 लाख, फूल बाजारातून 51 लाख, अशी एकूण 16 कोटी 41 लाख रुपयांची बाजार फी उत्पन्न मिळाले आहे.