Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Solapur › ४१ वाळूसाठ्यांचा टप्प्याटप्प्याने लिलाव

४१ वाळूसाठ्यांचा टप्प्याटप्प्याने लिलाव

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 10:08PM सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणार्‍या वाळू स्थळांचा मायनिंग प्लॅन करून हरित लवादाच्या अधिन राहून जिल्ह्यातील जवळपास 41 वाळू स्थळांचा टप्प्याटप्प्याने लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

सध्या वाळू लिलाव बंद असल्याने शासकीय कामांबरोबरच खासगी आणि वैयक्तिक विकासकामे ठप्प झाली आहेत. बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या जवळपास 50 हजार कर्मचार्‍यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाळूसाठ्यांचे लिलाव तत्काळ व्हावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. दुसरीकडे वाळू लिलाव बंद असताना चोरून वाळू उपसा सुरूच आहे, अशा तक्रारींची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विविध विभागांच्या प्रमुखांची आज बैठक घेतली. यावेळी होणारी वाळू चोरी त्यासाठी प्रतिबंध करण्याची यंत्रणा पोलिस आणि महसूल प्रशासनाने संयुक्त येऊन करण्याची कारवाई तसेच वाळू तस्करांकडून अचानक होणारे हल्ले यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

वाळू लिलावासाठी हरितलवादाच्या अटी आणि निकष  यांचे पालन करुन तसेच जिल्ह्यात उपलब्ध असणार्‍या वाळूसाठ्यांचे नियम आणि अटीनुसार मायनिंग प्लॅन करुन त्यांचा टप्प्याटप्प्याने लिलाव करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. या 41 वाळूसाठ्यांमधून जवळपास 9 लाख ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक कामे सुरळीत होतील, असा विश्‍वास जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे शासकीय कामांसाठी आणि प्रयोजनासाठी लागणार्‍या वाळूची मागणी करावी तसेच त्यासाठी आवश्यक असणारी रक्कम येत्या 27 मार्चपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे जमा करावी अन्यथा मायनिंग प्लॅन झालेल्या पंढरपूर तालुक्यातील अर्जुनसोंड आणि देगाव मुंढेवाडी येथील वाळूसाठ्यांतून या शासकीय कामांना वाळू उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याठिकाणातून खासगी कामांनाही वाळू उपलब्ध होणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला.