होमपेज › Solapur › ४० हजार थकबाकीदारांची वीज कट

४० हजार थकबाकीदारांची वीज कट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीज बिलांचे थकबाकीदार असलेल्या 47 हजार 438 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यात ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील 40 हजार ग्राहकांचा समावेश आहे.  ही मोहीम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने 29 व 30 मार्चला महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बारामती परिमंडलात वीज बिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहीम सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत बारामती, सातारा व सोलापूर मंडलात 11 कोटी 12 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 47 हजार 438 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 3 हजार 189 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 2 कोटी 16 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. सातारा मंडलातील 4 हजार 343 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 85 लाखांच्या थकीत वीज बिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.  सोलापूर मंडलातील 39 हजार 906 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 8 कोटी 11 लाखांच्या थकीत वीज बिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. 

या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीज बिलांचा वीज ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून बारामती परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीज बिले भरणा केंद्रे 29 व 30 मार्चला सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. वीज ग्राहकांकडे किती रक्‍कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. बारामती परिमंडलातील शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे व सुट्टीच्या दिवशीसुद्धा ही कारवाई आक्रमकपणे सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.  एप्रिल महिन्यातही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. 


  •