Tue, Apr 23, 2019 20:22होमपेज › Solapur › पोलिसाच्या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पोलिसाच्या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 9:38PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिस शिपायाच्या 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या पोलिस शिपायास  जिल्हा  सत्र न्यायाधीश  वाय. जी. देशमुख यांनी 10 वर्षे  सक्‍तमजुरी व 50 हजार  रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पोलिस शिपाई लखू ऊर्फ लखन गायकवाड (वय 45, रा. कवितानगर पोलिस  वसाहत, सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली होती. पोलिस शिपाई लखू गायकवाड यास यापूर्वी उस्मानाबाद न्यायालयाने अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा दिलेली आहे.

21 फेब्रुवारी 2016 रोजी पीडित मुलीच्या आजीची  प्रकृती बरी नसल्याने त्यांच्याकडे बरेच नातेवाईक आले होते. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने तिला झोपेतून उठवून  कपडे  घालून तयार केले व शेजारी राहणार्‍या लखू गायकवाड याच्या मुलीने तिला खेळावयास घेऊन गेली. त्यानंतर काही वेळानंतर आलेल्या लोकांना लखू गायकवाड याचे घर दाखविताना त्याच्या घराचा दरवाजा उघडला असता पीडित मुलगी ही घरातून रडत बाहेर पडली. त्यावेळी तिला रडण्याचे कारण विचारले असता त्यावेळी तिने गायकवाड याच्या घरात घडलेली हकीकत सांगितली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने पीडित मुलीला दवाखान्यात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यामुळे गायकवाड याच्याविरुद्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याची  सुनावणी  जिल्हा न्यायाधीश देशमुख  यांच्यासमोर  झाली. याप्रकरणी सरकारच्यावतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचे पुरावे व सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी गायकवाड यास 10 वर्षे सक्‍तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. संतोष न्हावकर, सहायक सरकारी वकील माधुरी देशपांडे यांनी, तर आरोपीकडून अ‍ॅड. इस्माईल शेख यांनी काम पाहिले.