Thu, Jun 27, 2019 10:28होमपेज › Solapur › सानिकाची "आई" ऐका, भावूक झाल्याशिवाय राहणार नाही (Video)

सानिकाची "आई" ऐका, भावूक झाल्याशिवाय राहणार नाही (Video)

Published On: Aug 04 2018 7:50AM | Last Updated: Aug 04 2018 11:36AMमहादेव कांबळे : पुढारी ऑनलाईन

गावाकडची पोरं हुशार असं उपरोधानं किंवा खरं खरं नेहमीच म्‍हटलं जातं, पण या आधी हे हुशारपण कधी पाहण्यात यायचं नाही. गावाकडच्या पोरांनी स्‍कॉलरशीप, दहावी-बारावीत चांगले गुण घेतले की, वृत्तपत्रात नावासह फोटो छापून यायचा. तेवढचं काय ते त्यांचं हुशारपण सगळ्यांच्या नजरेत यायचं. बाकी सगळा हुशारपण गावापुरतं मर्यादित राहायचं. सध्या जग झपाट्यानं बदललं आहे. जग बदलण्याचा फायदा हाच झाला की, गाव ते ग्लोबल व्‍हायलला आता वेळ लागत नाही. अशीच कथा सोलापूर जिल्‍ह्यातील भाळवणी गावातील आहे. 

भाळवणीतील जिल्‍हा परिषदेच्या शाळेत शिकणारी सानिका सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली सानिका दिलीप करडे ही तिसरीत शिकते आहे. तिच्या वर्गशिक्षकांनी तिला कविता सादर करण्यास सांगितली. सरांनीच दिलेली ही कविता सानिकाने तालबद्ध करून तिने वर्गासमोर सादर केली. 

शिक्षकांनाही तिची कविता भावली. जगातील सुंदर गोष्ट म्‍हणजे आई. लहान असो, मोठा असो आई ही प्रत्येकाला भावणारीच असते. आईवर कथा, कविता, कादंबरी, नाटक आणि चित्रपटही झाले, अन्‌ सध्या सोशल मीडियावर नव्‍या पद्धतीने आई सांगण्याची रूची अनेकात वाढली आहे. 

शाळेत असताना वर्गशिक्षकांनी आईवर कविता वाचून दाखवली. शिक्षकांनीच मग त्या कवितेला तालबद्ध करून पुन्‍हा वर्गासमोर सादर केली. तिच कविता घेऊन सानिकाने ही  कविता वेगळ्या पद्धतीनं सर आणि वर्गासमोर सादर केली. सानिकाने कवितेतून सांगितलेली ही आई सध्या सोशल मीडियावर प्रचंडच व्हायरल होत आहे.  

"आई तुझ्या मुर्तीवाणी 
या जगात मुर्ती नाही
अनमोल जन्‍म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही"

गाण्याची ही सुरूवात ज्या पध्दतीने सानिकाने सुरू केली आहे ती पट्टीच्या गायकापेक्षा कमी नाही. आवाजात असणारी एक भावूक नजाकत सानिकाच्या जाणवणारी आहे. लय, ताल, सूर या संगीताच्या नियमात सानिकाची कविता कदाचित बसत नसेल पण ती ज्या सहजतेनं गाणं सादर करते ते एखाद्या मैफिलीतील गायिकेसारखीच भासत आहे.

सानिकाचा आवाज टिपेला जाणारा असल्याने साहजिकच लक्षवेधी आहे. ज्या पद्धतीनं ती कविता सादर करते त्या कवितेतील आई सार्‍यानाच भावणारी आणि आपल्या आईची आठवण करून देणारी आहे.  
अनमोल जन्‍म दिला ग आई...हे ज्या नजाकतेनं ती सादर करते, ती नजाकत तिच्याच आवाजात ऐकताना "आई" ही गोष्ट अधिकाधिक मायाळू वाटते.