Sat, Mar 23, 2019 00:34होमपेज › Solapur › सोलापूरसाठी ३४ तर बार्शीसाठी ३२ हजार मतदार वाढले

सोलापूरसाठी ३४ तर बार्शीसाठी ३२ हजार मतदार वाढले

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:13PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातल्या सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना निवडणूक शाखेने दिल्या होत्या. त्यानुसार निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या त्यानंतर सात बारा उतार्‍यावर नाव असलेल्या सर्वच शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सोलापूरसाठी 34, तर बार्शी बाजार समितीसाठी 32 हजार मतदारांची संख्या वाढली आहे.

सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी पूर्वी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ज्यांच्या नावावर सात बारा उतारा त्याला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला होता. त्यानुसार बार्शी बाजार समितीसाठी 76 हजार 454 मतदारांची यादी तयार करण्यात आली होती, तर सोलापूर कृषी बाजार समितीसाठी 82 हजार 351 मतदारांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतर काही शेतकरी न्यायालयात गेले तर काहींनी निवडणूक प्राधिकरणाकडे दाद मागितली. त्यामुळे शेतीच्या सातबारा उतार्‍यावर ज्या-ज्या लोकांची नावे आहेत, त्या सर्वांनाच मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बार्शी बाजार समितीसाठी 32, तर सोलापूर कृषी समितीसाठी 34 हजार शेतकरी मतदारांची संख्या वाढली आहे. यासाठी  येत्या 13 मार्च रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यासाठी हरकती घेण्याची मुदत 25 मार्चपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 26 मार्च रोजी आलेल्या हरकतींवर निर्णय घेण्यात येणार आहे, तर अंतिम मतदार यादी 14 मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी वेळीच आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहनही निवडणूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.