Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › २५६ गाळे घरकुलांचे होणार पुनर्वसन 

२५६ गाळे घरकुलांचे होणार पुनर्वसन 

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 8:42PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदानातून रविवार पेठेतील 256 रहिवास गाळ्यांचे पुनर्वसन करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दरम्यान, सुमारे 40 वर्षांची थकीत मिळकतकराची बिले मनपाने वितरित केली असून यामधील शास्ती, नोटीस-वॉरंट फी माफ करण्यास आयुक्‍तांनी तत्वत: मान्यता दिल्याने रहिवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

सुमारे 45 वर्षांपूर्वी पूर्व भागातील काही झोपडपट्ट्यांना लागलेल्या आगीमुळे तेथील रहिवाशी बेघर झाले होते. मनपाने झोपडपट्टीची जागा ताब्यात घेऊन रविवार पेठेत 256 रहिवास गाळे बांधून 1975 मध्ये या लोकांचे पुनर्वसन केले होते. या गाळ्यांना नाममात्र भाडे आकारुन मनपाने नंतर मिळकतकरदेखील लागू केला होता, मात्र मिळकतकरावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद शासनदरबारी गेला. याबाबत सन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कर वसुलीला स्थगिती दिली होती, यानंतर शासनाने दोन वेळा पत्र पाठवून याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना मनपाला केली, मात्र मनपाकडून कार्यवाही झाली नाही. सन 2008 मध्ये मनपा सर्वसाधारण सभेत गाळ्यांच्या मिळकतकरात 50 टक्के माफीचा ठराव झाला होता, पण प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी केली नाही. नोव्हेंबर 2017 च्या नोटाबंदीनंतर मनपाने मिळकतकरवसुलीची मोहीम सुरू केल्यावर तत्कालीन आयुक्‍त विजयकुमार काळम-पाटील यांनी सन 2008 च्या ठरावाची अंमलबजावणी करु, असे आश्‍वासन दिल्याने अनेक रहिवाशांनी 10 हजार रुपये थकीत करापोटी भरले होते. त्यानंतर काही महिन्यांनी काळम-पाटील यांची बदली झाल्यानंतर हा विषय प्रलंबित राहिला होता.

या पार्श्‍वभूमीवर विद्यमान आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गतवर्षी या गाळ्यांना भेट दिली असता रहिवाशांनी गाळ्यांमधील धोकादायक गॅलरीची दुरुस्ती, अतिक्रमण करून केलेले वाढीव बांधकाम, थकीत मिळकतकर आदी मुद्दे ऐरणीवर आले. आयुक्‍तांनी 50 टक्के करमाफी होणार नाही, असे सांगत संपूर्ण कर भरण्याची सूचना रहिवाशांना केली. त्याचसोबत गाळे जुने झाल्याने पंतप्रधान आवास योजनेतून नवीन घरे बांधून गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्तावही थकीत मिळकतकर संपूर्णपणे भरण्याच्या अटीवर मांडला होता. एवढेच नव्हे तर आयुक्‍तांनी 50 टक्के करमाफीचा मनपा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवून दिला. संपूर्ण कर भरण्याच्या अटीवरून रहिवाशांमध्ये एकमत नाही. आयुक्‍तांनी याबाबत अनेकदा बैठका झाल्यावर तोडगा निघत नव्हता. 

नुकतेच अनेक गाळेधारकांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन एकरकमी कर भरण्यास तसेच गाळ्यांचे पुनर्वसन करण्याच्या योजनेला संमती दर्शविली. यावेळी आयुक्‍तांनी एकरकमी कर भरल्यास शास्ती, नोटीस-वॉरंट फी माफी करण्यास तत्वत: मान्यता दिली. त्यामुळे या गाळ्यांचे पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रशासन व गाळेधारकांमध्ये झालेल्या सुसंवादानंतर मनपा कर संकलन विभागाने गाळेधारकांना थकीत मिळकराच्या बिलांचे वाटप केले आहे. तसेच शास्ती, नोटीस-वॉरंट फी माफीचा प्रस्ताव तयार करुन आयुक्‍तांकडे मंजुरीसाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जर या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर  एका गाळेधारकाचे किमान 30 हजार रुपये वाचणार आहेत. तसेच पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान वगळता गाळे बांधण्यास लागणारा उर्वरित खर्च करण्याची तरतूद गाळेधारकाने केल्यास त्याला नवीन घराचा लाभ होणार आहे.