Fri, Jul 10, 2020 21:01होमपेज › Solapur › २१ लाखांचा गुटखा पकडला 

२१ लाखांचा गुटखा पकडला 

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:57PM

बुकमार्क करा

दिंद्रुड : प्रतिनिधी

सोलापूरहून पाथरी (जि. परभणी) येथे जात असलेला गुटख्याने भरलेला टेम्पो दिंद्रुड पोलिसांनी पकडला. टेम्पो आणि 21 लाखांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सय्यद असिफ यांनी दिली.

बुधवारी (दि. 6) पहाटे तेलगाव-नित्रूड रोडवर फौजदार युवराज टाकसाळे व पो.कॉ. कनकदास बनसोडे गस्त घालत होते. अतिवेगाने धावणार्‍या टेम्पोबद्दल संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून टेम्पो पकडला. टेम्पोची झडती घेतली असता पुढच्या बाजूस पीठाचे पोते व पाठीमागे गुटख्याच्या मोठमोठ्या 30 गोण्या पोलिसांना मिळून आल्या. पो.नि. सय्यद असिफ तोपर्यंत घटनास्थळी दाखल झाले होते. 

टेम्पोचालक संतोष संभाजी नागरगोजे (वय 24) व क्लीनर नाथराव माणिक नागरगोजे (दोघेही रा. रामवाडी, ता. चाकूर, जि. लातूर) यांची कसून चौकशी केली असता हा गुटखा कर्नाटकातून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. मोठ्या कंटेनरने सोलापूर येथे उतरलेला माल टेम्पो (क्र. एमएच 13 - 0869) यात भरून पाथरी येथे जात होता. पाथरी येथे पोहोचल्यास माल (गुटखा) कुठे उतरायचा ते गाडी मालक फोनवरून सांगणार होते, असेही तो म्हणाला. 

या टेम्पोत गोवा 1000 या कंपनीच्या गुटख्याच्या मोठ्या 30 गोण्या मिळून आल्या असून त्याची बाजारातील किंमत 21 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कार्यवाहीची माहिती वरिष्ठांसह अन्‍न सुरक्षा प्रशासनाला कळविण्यात आली. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये येऊन गुटख्याचे नमुने घेतले. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींसह टेम्पो व मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास पो.नि. सय्यद असिफ करत आहेत.