Sat, Feb 23, 2019 16:50होमपेज › Solapur › चिलका कारखान्यात २१ लाखांचा अपहार

चिलका कारखान्यात २१ लाखांचा अपहार

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 9:56PMसोलापूर : प्रतिनिधी

कच्चा व पक्का माल परस्पर विकून चिलका कारखान्यात 21 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कारखान्याच्या व्यवस्थापकास 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी कुरवे यांनी दिले.

रमेश गणपत नल्ला (वय 40, रा. 1703, दत्तनगर, सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत चिलका कारखान्याचे मालक व्यंकटेश सिद्रामप्पा चिलका (वय 48, रा. 1342, भद्रावती पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

व्यंकटेश   चिलका   यांच्या   पद्मावती टेक्स्टाईल, व्यंकटेश चिलका मिल, चिलका टॉवेल इंटरनॅशनल, व्यंकटेश चिलका डाईंग, राघवेंद्र टेक्स्टाईल, सिद्धेश्‍वर डबलिंग अशा विविध फर्म आहेत. 
रमेश नल्ला हा चिलका यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. नल्ला याने चिलका यांचा विश्‍वास संपादन केल्यामुळे चिलका यांनी त्यांच्या सर्व फर्ममध्ये नल्ला यास व्यवस्थापक म्हणून बढती दिली होती. चिलका हे एप्रिल 2015 मध्ये आजारी पडले असताना नल्ला याने चिलका यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन बनावट कागदपत्रे तयार करून तसेच कोर्‍या सह्या केलेल्या चेकची चोरी करून ते चेक बँकेत भरण्यायोग्य करुन लाखो रुपयांची रक्कम बँकेतून काढून परस्पर वापरली. पार्टीस चेक देण्याचे कारण सांगून चिलका यांच्या चेकवर सह्या घेतल्या. त्या चेकवरुन बँकेतून रकमा काढून त्याचाही अपहार केला. चिलका यांच्या कारखान्यातून तयार झालेला कच्चा व पक्का माल परस्पर विकून त्याची रक्कमही स्वतः वापरली. अशाप्रकारे एप्रिल 2015 ते सप्टेंबर 2015 याकालावधीत व्यवस्थापक पदावर असताना नल्ला याने चिलका कारखान्यातील 20 लाख 98 हजार 760 रुपयांचा अपहार करुन चिलका यांची फसवणूक केली म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास करुन व्यवस्थापक रमेश नल्ला यास तेलंगणामधून अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड.  आनंद काळे यांनी, तर मूळ फिर्यादीकडून अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. गुरुदत्त बोरगावकर, अ‍ॅड. देवदत्त बोरगावकर यांनी, तर आरोपीकडून अ‍ॅड. हेमंत साका यांनी काम पाहिले.