Sat, Jul 20, 2019 11:27होमपेज › Solapur › राज्यातील १८३ गोदामे तुरीने हाऊसफुल्‍ल

राज्यातील १८३ गोदामे तुरीने हाऊसफुल्‍ल

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 9:51PMसोलापूर  प्रतिनिधी

राज्य शासनाकडून हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या तूर व हरभरा धान्यामुळे राज्यातील 183 गोदामे हाऊसफुल्‍ल झाले आहेत. हमीभावाने तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या 2 लाख 18 हजार शेतकर्‍यांची तूर खरेदी करणे शासनास शक्य नसल्याने प्रती शेतकरी प्रति क्‍विंंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. यासाठी 70 कोटी रुपयांचे अनुदानही राज्य शासनाकडून वितरीत करण्यात आले आहे.

हमीभावाने तूर व हरभरा पिकांची खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने जानेवारी व मार्च महिन्यात खरेदी केंद्र सुरु केले. या केंद्रात नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडून 15 मार्चपर्यंत तूरीची तर 29 मेपासून हरभर्‍याची खरेदी बंद  करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय गोदामे धान्यानी तुडूंब भरल्याने खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक करायची तरी कोठे, असा प्रश्‍न राज्य शासनापुढे पडला आहे. तूर व हरभर्‍याची खरेदी हमीभावाने खरेदी करुन त्याची साठवणूक करण्याची राज्य शासनाची क्षमता नसल्याने राज्य शासनाकडून नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्‍विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार शेतकर्‍यांना निर्धारीत मर्यादित अनुदान देण्यासाठी राज्यभरासाठी तातडीने 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना हे अनुदान लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हमीभावाने तूर व हरभर्‍याची विक्री करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी घरात तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीत धान्य ठेवले, तरीही या शेतकर्‍यांची खरेदी राज्य शासनाकडून करण्यात आली नाही. कृषी उत्पन्‍न बाजार समितीत तर हमीभावाच्या निम्माही दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची इकडे आड अन तिकडे विहीर अशी गत झाली आहे.

शेतकर्‍यांनी ऑनलाईनने नोंद केलेली सर्व तूर राज्य शासनाने विनाअट खरेदी करावी, अन्यथा बाजारात हमीभावाने तूर विक्री होईल अशी व्यवस्था नियमाने निर्माण करावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. शेतकर्‍यांची ही मागणी या सरकारकडून केव्हा मान्य होणार, याकडे सर्व शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.