होमपेज › Solapur › रमजान ईदमुळे शहरात १८०० पोलिसांचा बंदोबस्त

रमजान ईदमुळे शहरात १८०० पोलिसांचा बंदोबस्त

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 10:08PMसोलापूर : प्रतिनिधी

रमजान ईदसाठी शहरात आज जवळपास 1200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आयुक्‍त महादेव तांबडेे  यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस उपायुक्‍त, 4 सहायक  पोलिस आयुक्‍त, 17 पोलिस निरीक्षक, 65 पोलिस उपनिरीक्षक, 1200 पोलिस कर्मचारी, 500 होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोलापूर शहरात पाच ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून सार्वजनिक नमाज पठण करण्यात येते. होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह, रंगभवन चौकातील अहिले हदीस ईदगाह, जुनी मिल कंम्पौडमधील ईदगाह, पानगल हायस्कूल ईदगाह आणि आसार मैदान येथील  ईदगाह  मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नमाज पठण करतात. 

या ईदगाह मैदानावर नमाज पठणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखा, शहर गुन्हे शाखा, विशेष  शाखा आणि पोलिस  ठाण्यांकडूनही स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तसेच  शहरातील  मोठ-मोठ्या 13 मशिदींजवळ नमाज पठणाच्यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात 33 ठिकाणी सशस्त्र फिक्स पाँईट लावण्यात आलेले आहेत. त्याशिवाय खरेदीसाठी भरविण्यात आलेल्या मीना बाजार, बेगम बाजार, नई  जिंदगीमधील अमीना बाजार आदी ठिकाणीही पोलिसांकडून स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

बाशी खुदब्यासाठी स्वतंत्र बंदोबस्त

रमजान ईद झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुस्लिम बांधवांकडून बार्शी खुदबा साजरा करण्यात येतो. त्यामुळे शहरातील किल्ला उद्यान, विजापूर रोडवरील प्राणी संग्रहालय, शहरातील इतर उद्याने, चित्रपटगृहांमध्ये मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी होते. या सर्व ठिकाणी बार्शी खुदब्यादिवशी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

रमजान ईदनिमित्त विजापूर वेस येथील मीना बाजारमध्ये ईदच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या गर्दीवर व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे खरेदीदार ग्राहक व वाहनधारकांवर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला  नाही. रात्री उशिरापर्यंत मीना बाजारात खरेदीसाठी गर्दी होती.