Wed, Jan 23, 2019 08:58होमपेज › Solapur › रामदेवबाबांचे १७ ते १९ मार्चपर्यंत शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रम

रामदेवबाबांचे १७ ते १९ मार्चपर्यंत शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रम

Published On: Feb 09 2018 10:56PM | Last Updated: Feb 09 2018 8:50PM सोलापूर : प्रतिनिधी

पतंजली परिवारातर्फे योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांचे सोलापूर शहर व जिल्ह्यात 17 ते 19 मार्च याकालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यामध्ये योग शिबिर, महिला व शेतकरी मेळावा यांचा समावेश आहे, अशी माहिती पतंजली परिवार महिला विभागाच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

रामदेवबाबा यांचे सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. याअंतर्गत 17 ते 19 मार्च याकालावधीत अक्कलकोट येथे योग शिबिर दररोज पहाटे पावणेपाच ते सकाळी साडेसात यावेळेत होणार आहे. शनिवार, 17 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात तसेच रविवार, 18 मार्च रोजी राष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून सोलापुरातील पार्क स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात रामदेवबाबा मार्गदर्शन करणार आहेत.

खा. हेमामालिनी, अमृता फडणवीस यांची उपस्थिती

पार्क स्टेडियमवर होणार्‍या रामदेवबाबांच्या कार्यक्रमात प्रख्यात सिनेअभिनेत्री खा. हेमामालिनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्त्रियांचे आरोग्य, सक्षमीकरण, स्वसुरक्षा, अध्यात्म, महिला रोजगार, मुलांवर संस्कार आदींवर यावेळी मार्गदर्शन होणार आहे. यावेळी राज्यातील 5 कर्तृत्ववान महिलांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शुक्रवारी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकामधील पतंजली परिवारातील भगिनी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत, असे अळ्ळीमोरे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला पतंजली परिवाराचे जिल्हाध्यक्ष नितीन मोरे, रघुनंदन भुतडा, जिल्हा महिलाध्यक्षा सुजाता शास्त्री, नगरसेविका संगीता जाधव, दिलीप कोरके, अविनाश अळ्ळीमोरे, बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित होते.