Thu, May 23, 2019 21:10
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › कुलगुरूपदासाठी १६ जणांची मुलाखत; प्रा. देशमुखांचा समावेश

कुलगुरूपदासाठी १६ जणांची मुलाखत; प्रा. देशमुखांचा समावेश

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 10:01PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीकडून पात्र उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेस सोमवार, 16 एप्रिल रोजी मुंबईत सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकूण 16 जणांच्या मुलाखती झाल्या आहेत. ज्यामध्ये सोलापूरच्या प्रा. डॉ. एल. पी. देशमुख यांचा समावेश आहे.

डॉ. एन. एन. मालदार यांच्या सेवाकाल समाप्तीनंतर विद्यापीठाच्या चौथ्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी 100 हून अधिक अर्ज या पदासाठी प्राप्त झाले आहेत. अर्ज छाननीनंतर निवडक 27  उमेदवारांना कुलगुरू निवड समितीच्यावतीने मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यासाठी 16 व 17  एप्रिल रोजी मुंबई येथे या मुलाखती झाल्या असून यातील 27 पैकी 16 उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेतल्या. यामध्ये सोलापूर विद्यापीठातील पदार्थविज्ञानशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एल. पी. देशमुख यांचीही समावेश आहे. 

उर्वरित   11 उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्याची माहिती समितीचे नोडल ऑफिसर पिनाकी पटनाईक यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पी. व्यंकटरामा रेड्डी हे कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष आहेत. निवड समिती सदस्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, शंतनू चौधरी हे काम पाहात आहेत. या मुलाखती झाल्यानंतर यातील अंतिम पाचजणांची निवड होणार आहे. त्यानंतर त्या पाचजणांची मुलाखत स्वत: राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव हे घेणार आहेत. ते एकाची कुलगुरू म्हणून निवड करणार आहेत. मंगळवारीही उर्वरित मुलाखती पार पडल्या असून आता घोषणेची प्रतीक्षा लागून राहिली आहे.