Mon, Jun 17, 2019 04:19होमपेज › Solapur › १२ हजार विकास सोसायट्या बंद पडल्या

१२ हजार विकास सोसायट्या बंद पडल्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 सोलापूर : प्रतिनिधी

सहकार क्षेत्रात काम करीत असताना आर्थिक नियोजन न झाल्याने राज्यातील 12 हजार विकास कार्यकारी सोसायट्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत सापडला आहे. या सहकारी संस्थांना पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने आगामी काळात 5 हजार विकास कार्यकारी सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी इंदिरा गांधी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गावातील पैसा गावातच राहावा, असे वाटत असेल तर प्रत्येक गावातील विकास कार्यकारी सोसायट्यांनी आता आर्थिकदृष्ट्या नियोजन करायला हवे, त्यासाठी कायद्यान्वये ठेवी स्वीकाराव्यात, असे आवाहनही देशमुख यांनी केले. तर राज्यात जवळपास 200 साखर कारखाने असून त्यापैकी 40 कारखाने बंद पडले आहेत. ते कारखाने चालू करण्याच्या दृष्टीने राज्यसरकार पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच उद्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने ज्या-ज्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी तात्काळ अर्ज करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली असून ती परिस्थिती सुधारणे आवश्यक असल्याचे सांगून बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी बोलताना सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी बँकेचा इतिहास सांगत असताना बँकेने गेल्या शंभर वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच यामुळे जिल्ह्याचा विकास किती झपाट्याने झाला, याची अनेक उदाहरणे दिली. तर आपल्या भाषणात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे भाजप सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत उदासीन असून गेल्या दोन वर्षात रोजगार निर्मितीत मोठी घट झाल्याचे सांगत विद्यमान सरकार अनेक गोष्टीत अपयशी ठरत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन राजन पाटील, व्हाईस चेअरमन जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे, सिद्रामप्पा पाटील, आ. भारत भालके, आ. सिध्दाराम म्हेत्रे, सुभाष शेळके, सुनंदा बाबर, आ. प्रशांत परिचारक, आ. रामहरी रुपनवर, सुरेश हसापुरे यांच्यासह  संचालक, कारखान्याचे चेअरमन, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  •