Wed, Jul 17, 2019 20:16होमपेज › Solapur › १०८ अ‍ॅम्ब्युलन्सचा रुग्णाला सुविधा देण्यास नकार

१०८ अ‍ॅम्ब्युलन्सचा रुग्णाला सुविधा देण्यास नकार

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 10:13PMसोलापूर : प्रतिनिधी

तिर्‍हे येथे अपघातातील रुग्णांच्या नातेवाईकांनी 108 या अ‍ॅम्ब्युलन्सला कॉल केला होता. त्यावेळी अ‍ॅम्ब्युलन्समधील डिझेल संपल्याचे कारण सांगत त्यांना रुग्णसेवा देण्यास नकार देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे गरजू रुग्णाला खासगी वाहनाने दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली. परंतु, खासगी वाहन व्यवस्थित नसल्याने त्या रुग्णाला मरणयातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे यातील दोषींवर वारंवार रुग्णसेवेस टाळाटाळ केल्यामुळे कारवाईची मागणी होत आहे.

यापूर्वी 108 या अ‍ॅम्ब्युलन्समधून देगाव नाका येथील एका नामांकित मॉलमध्ये बाजार खरेदी करताना दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने कॅमेराबद्ध केले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांनी नोटीस व समज देऊन जाब विचारला होता. त्याला काही दिवस उलटले नाहीत, तोवर तिर्‍हे येथील प्रकरण समोर आले आहे. रुग्णाला अ‍ॅम्ब्युलन्सची गरज असताना 108 अ‍ॅम्ब्युलन्सकडून ‘डिझेल संपले आहे.’ हे उत्तर अपेक्षित नाही. यावरून रुग्णसेवेला सोलापुरातील 108 ही अ‍ॅम्ब्युलन्स कायम रुग्णसेवेस टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यातील 108 अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा देणारी  बीव्हीजी ही कंपनी आणि येथील जिल्हा समन्वयक अनिल काळे यांच्यावर कारवाई करावी होणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.