Mon, Aug 19, 2019 13:22होमपेज › Solapur › सोलापूर लोकसभा तयारी; सप्टेंबरपर्यंत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी

सोलापूर लोकसभा तयारी; सप्टेंबरपर्यंत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 21 2018 11:50PMसोलापूर : महेश पांढरे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभाग आता कामाला लागला असून निवडणुकीच्या तयारीसाठी आता येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अंतिम करण्याचे काम निवडणूक शाखेने हाती घेतले आहे. यामध्ये 1 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी, 31 ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावरील हरकती आणि दाव्यांची सुनावणी, 30 नोव्हेंबर रोजी दावे आणि हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये एनव्हीएसपीडॉटइन या संकेतस्थळावर जाऊन आपला मोबाईल क्रमांक नमूद करुन आपली मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव वगळणी, दुरुस्तीसाठी अर्ज करता येतो. पहिल्यांदाच नोंदणी करणार्‍या  नागरिकांनी आपल्या वयाचा पुरावा रंगीत फोटोसह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नावाची नोंद असणे लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 कलम 17, 18 आणि 31 अन्वये चुकीचे आहे. त्यामुळे आशा लोकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी असे प्रकार स्वत:हून टाळण्याचे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 480 मतदार याद्यांचे भाग करण्यात आले आहेत. त्यांची बुथनिहाय तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये मतदार याद्यामध्ये नाव समाविष्ट करणे, अनिवासी भारतीयांची नावे यादीत घेणे, परगावी राहात असलेल्यांची नावे वगळणे, मतदार यादीतील तपशील बदलणे, पत्ता बदल करणे यासारख्या दुुरुस्त्याही करण्यात येणार आहेत. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती धुमाळ यांनी यावेळी दिली आहे.

जिल्ह्यात 32 लाख 27 हजार 58 मतदारांची सध्या नोंद

सोलापूर जिल्ह्यातील एकूण 32 लाख 27 हजार 58 मतदारांची नोंद असून यामध्ये 3 हजार 480 मतदान केंद्रे आहेत. 16 लाख 95 हजार 897 पुरुष, तर 15 लाख 31 हजार 96 स्त्री मतदारांची नोंद झाली आहे. 65 तृतीयपंथी मतदारांची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले.

महाविद्यालयीन तरुणांसाठी प्राचार्यांनी कॅम्प लावावेत

जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या 18 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी संंबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मतदार नोंदणी अधिकार्‍यांशी समन्वय साधून त्या त्या महाविद्यालयांत मतदार नोंदणीचे कॅम्प आयोजित करून मतदार नोंदणी वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसंख्या व मतदार संख्या यांचे गुणोत्तर 69.17 टक्के

सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या आणि मतदार यादीतील स्त्री- पुरुष यांची लोकसंख्या लक्षात घेतल्यास 1000 पुरुष मतदारांमागे  902 महिला मतदार आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील स्त्री-पुरूष गुणोत्तर 69.17 असे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणी वाढविण्यासाठी आता विशेष मोहीम हाती घेणे अपेक्षित आहे.