Tue, Apr 23, 2019 07:52होमपेज › Solapur › फेसबुक मित्र स्नेह संमेलनाने जोडली मने

फेसबुक मित्र स्नेह संमेलनाने जोडली मने

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:10PMपंढरपूर : प्रतिनिधी 

एरव्ही फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर एकमेकांशी विविध राजकीय पक्ष, नेते, विचार धारा, जाती, धर्मावरून भांडणारे लोक पंढरपुरात पहिल्यांदाच झालेल्या फेसबुक मित्र स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले आणि आभासी जगातील मित्राला पाहून भारावून गेले. एकमेकांची मने जोडणार्‍या या स्नेहसंमेलनामध्ये सोशल मीडिया, सायबर क्राईम,  सोशल मीडियातील व्यवसायिक संधी, महिलांची सोशल  मीडियातील सावधगीरी अशा अंगाने मान्यवरांचे मार्गदर्शनही मिळाले.

पंढरपूर येथील सिंहगड महाविद्यालयात आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या फेसबुक स्नेहसंमेलनाची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. रविवार( दि. 19 रोजी)  या संमेलनाचे उद्घाटन राज्याच्या सायबर विभागाचे प्रमुख बालसिंग राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदी 65 वर्षीय फेसबुक वापरकर्ते मुरलेंद्र शेटे  यांची निवड करण्यात आली.   मंचावर सोशल मीडियातील तज्ज्ञांसह सिंहगडचे  प्राचार्य डॉ़  कैलास कारंडे आदी उपस्थित होते़ 
यावेळी बालसिंग रजपूत, वैभव छाया, अश्‍विनी सातव, सूरज भानूशाली, स्नेहलकुमार कदम, गणेश अटकळे आदींनी मार्गदर्शन केले. 

सकाळी 10 वाजता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी, तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी, अजित वाडेकर आणि केरळच्या नैसर्गीक आपत्तीमध्ये मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून सुरुवात करण्यात आली.  

या संमेलनात पंढरपूर तालुक्यातील युवक नेत्यांसह सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध समाज घटकातील फेसबुक  वापरकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सायंकाळी राष्ट्रगीताने या संमेलनाची सांगता करण्यात आली.   या फेसबुक संमेलनाला पंढरपूरसह पुणे, सोलापूर, मुंबई, सांगली जिल्ह्यातून कधीही न भेटलेले मित्र एकत्र आले़   दिवसभर विविध व्याख्यांना शिवाय कथा, कविता, गाणी, विनोद आदींचा आस्वाद घेतला. अतिशय मोकळ्या वातावरणात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेले हे फेसबुक मित्र स्नेहसंमेलन उत्स्फूर्तपणे संपन्न झाले. या फेसबुक मित्र स्नेह  संमेलनामुळे  पंढरपूर शहरातील सामाजिक विश्‍वास एक विधायक कार्य घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.